मुंबई – भेसळयुक्त खाद्यपदार्थ किंवा इतर कोणत्याही बाबींवर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाची बारीक नजर असते. मात्र, तरीदेखील हे प्रकार सर्रासपणे सुरू असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. या प्रकारातून नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्याचा भयंकर प्रकार हे भेसळ करणारे व्यावसायिक करत असतात. असाच एक प्रकार नुकताच मुंबईतील नालासोपाऱ्यामध्ये उघड झाला असून सर्रासपणे खाद्यतेलामध्ये भेसळ केली जात असल्याचे या ठिकाणी दिसून आले. तसेच देशातील 587 जिल्हे आणि चार महानगरांमधील विविध खाद्यतेलाच्या 4,461 नमुन्यांपैकी सुमारे 2.42 टक्के नमुने सुरक्षा मानकांशी जुळत नसल्याचे आढळून आले. यामध्ये अफलाटॉक्सिन, कीटकनाशकांचे अवशेष आणि जड धातूंची उपस्थिती एफएसएसआरने निर्धारित केलेल्या पातळीपेक्षा जास्त होती.
अनधिकृतपणे खाद्यतेलांमध्ये भेसळ केली जात असल्याच्या ग्राहकांकडूनतक्रारी येत होत्या. हे खाद्यतेल मुंबई परिसरामध्ये वेफर्स, फरसाण बनवणाऱ्या उद्योजकांना विकलं जात होतं. त्यामुळे आपण खात असलेल्या वेफर्स-फरसाणसाठी भेसळयुक्त तेल वापरले जात असल्याची शक्यता देखील या भांडाफोडीमधून समोर आली आहे. काही बोगस कंपनीत असे तेल पॅकिंग होते अशा व्यापारी व व्यवसायिकांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात येणार आहे, अशी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) दिली.
तसेच प्राधिकरणाने नमूद केले की गुणवत्ता श्रेणीतील सुमारे 2.42 टक्के (108) नमुने मानदंडांचे पालन करत नाहीत. लेबल मिसब्रँडिंग श्रेणीतील सुमारे 572 (12.8 टक्के) नमुने व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असल्याच्या दाव्याचे पालन करत नव्हते. तसेच काही नमुने शेल्फ-लाइफ मानदंड आणि अॅडिटिव्हजच्या विहित मानकांची पूर्तता करण्यात अयशस्वी झाले. ऑगस्ट 2020 दरम्यान केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणाचे निष्कर्ष प्रसिद्ध करून प्राधिकरणाने राज्यांना तेलातील भेसळ रोखण्यासाठी अंमलबजावणी मोहीम तीव्र करण्यास सांगितले आहे.