मुंबई – एखाद्या लिंकवर क्लिक केल्यानंतर मोबाईलमध्ये व्हायरस गेल्याचे आपण ऐकले होते. मात्र इस्राईलचे जासुसी सॉफ्टवेअर पेगासस हे एका साधारण व्हॉट्सएप कॉलच्या माध्यमातूनही मोबाईलमध्ये प्रवेश करू शकते. पेगासस हा एक व्हायरस असून तो मोबाईलमधील विविध एन्ट्रीज डिलीट करतो. विशेष म्हणजे या व्हायरसला मोबाईलमध्ये शिरण्यासाठी व्हॉट्सएप कॉलवर बोललेच पाहिजे, असे आवश्यक नाही. कॉल रिसीव्ह केला नाही तरीही व्हायरस आत येऊ शकतो.
इस्राईलची कंपनी एनएसओ हिने पेगासस विकसित केल्यानंतर विविध देशांच्या सरकारला विकायला सुरुवात केली. २०१३ मध्ये ४ कोटी डॉलर कमावणाऱ्या या कंपनीची कमाई २०१५ पर्यंत जवळपास चार पटींनी वाढून १५.५ कोटी डॉलरपर्यंत केली. सॉफ्टवेअर अत्यंत महागडे आहे, त्यामुळे सामान्य कंपन्या किंवा संस्था ते खरेदी करूच शकत नाही.
२०१६ मध्ये पहिल्यांदा अरब राष्ट्रांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आयफोनमध्ये त्याचा वापर झाला. पण त्यापासून बचाव करण्यासाठी एपलने तातडीने आयओएस अपडेट करून सुरक्षेतील त्रुटी दूर केल्या. एक वर्षांनंतर अँड्रॉईडमध्येही पेगाससची हेरगिरी सुरू असल्याचे पुढे आले. २०१९ मध्ये फेसबुकच्या सुरक्षा तज्ज्ञांनी पेगासस हा एक मोठा धोका असल्याचे सांगून त्याच्या विरुद्ध खटला दाखल केला. त्याचवेळी व्हॉट्सएपने भारतात अनेक कार्यकर्ते व पत्रकारांच्या मोबाईलमध्ये याचा वापर केल्याचा खुलासा केला.
हा व्हायरस करतो काय?
युझरच्या मोबाईवर संपूर्ण ताबा मिळवतो आणि मेसेज वाचायला सुरुवात करतो. फोन कॉल ट्रॅप करायला लागतो. विविध एप आणि त्यातील माहिती चोरायला लागतो. लोकेशन, डेटा, व्हिडीयो कॅमेऱ्याचा वापर व फोनच्या मायक्रोफोनमधून आवाज रेकॉर्ड करून घेतो. अँटीव्हायरस तयार करणाऱ्या एका कंपनीने पेगासस एसएमएस, ब्राऊझिंग हिस्ट्री, कॉन्टॅक्ट आणि ईमेल्स तर बघतोच, शिवाय स्क्रीनशॉटही घेतो, असे म्हटले आहे.