अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून लावणी क्विन गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमांवरून बरीच चर्चा सुरू आहे. एकीकडे गौतमी पाटीलचे डान्स शो हाउसफुल्ल जात असताना दुसरीडे असे कार्यक्रम बंद व्हायला हवेत, अशीदेखील होऊ घातली आहे. दरम्यान, अहमदनगर येथील गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात पैशांचा वर्षाव झाल्याच्या घटनेने नवीन वाद पुढे आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे गुरुवारी (२३ फेब्रुवारी) रात्री गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. मात्र गौतमीचा डान्स सुरु होताच काही प्रेक्षकांनी तिच्यावर पैशांची उधळण सुरु केली. त्यामुळे गौतमीने नाराजी व्यक्त करत डान्स थांबवला आणि स्वतः माईक हातात घेत प्रेक्षकांना गोंधळ न करण्याची विनंती केली. गौतमीने डान्स थांबवल्याने प्रेक्षकांनी कल्ला करत तुफान राडा घातला.
अतिउत्साही प्रेक्षकांना नियंत्रित करताना ६० बाऊन्सरसह आयोजकांची चांगलीच दमछाक झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करत गर्दीला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही गोंधळ सुरुच राहिल्याने अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यावेळी प्रेक्षकांची एकच धावपळ उडाली आणि आयोजकांना कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. एवढं होऊनही काही प्रेक्षकांनी गौतमी पाटील गाडीत बसत असताना तिच्या गाडीला घेराव घालत गोंधळ घातला अखेर बाऊन्सर आणि पोलिसांच्या गराड्यात गौतमी पाटील कार्यक्रम स्थळावरुन बाहेर पडली.
लावणी क्विन आणि वादाचे जुने नाते
गेल्या काही महिन्यांपासून लावणी क्वीन गौतमी पाटीलची जोरदार चर्चा आहे. सुरुवातीला फारशी चर्चेत नसलेल्या गौतमीवर एका नृत्यादरम्यान केलेल्या अश्लील हावभावाने टीकेची झोड उठली. नंतर तिला अधिकच प्रसिद्धी मिळाली. तिच्या प्रसिद्धीमुळे तिला नृत्याच्या सुपाऱ्या देखील जास्त येऊ लागल्या. गौतमी पाटील तिच्या नृत्याच्या शैलीमुळे वादात अडकली होती. अश्लील हावभावामुळे गौतमी पाटीलने लावणीला बदनाम केल्याचा आरोप ज्येष्ठ लावणी कलावंतांनी तिच्यावर केला होता. या वादानंतर तिने माफी मागून असे प्रकार पुन्हा घडणार नसल्याचे म्हटले होते.
https://twitter.com/namrata_INDIATV/status/1629012477777432579?s=20
Dancer Gautami Patil Show Ruckus Police Lathi charge