मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोशल मिडियावर काय व्हायरल होईल आणि काय नाही, याचा काही नेम नाही. व्हायरल गोष्टींवर किती विश्वास ठेवावा हाही एक प्रश्नच आहे. पण, व्हायरल पोस्टमधील गंमत मात्र चांगलीच चर्चेची ठरत असते. असाच एक सुटीचा अर्ज सध्या व्हायरल झाला आहे. त्यावर एका एसटी चालकाने गौतमी पाटीलचा डान्स बघण्यासाठी दोन दिवस सुटी मागितली आहे.
गौतमी पाटीलचा मोठा चाहता वर्ग महाराष्ट्रात तयार झाला आहे. तिच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी आणि जवळून डान्स बघण्यासाठी सुरू असलेली धडपड यावरून हे सिद्ध होते. तिच्या बऱ्याच कार्यक्रमात चाहत्यांनी राडा केल्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. पण गौतमीची एक झलक बघण्यासाठी चाहते पोलिसांच्या लाठ्या खायलाही तयार असतात अशी परिस्थिती आहे. अश्याच एका चाहत्याचा सुटीचा अर्ज सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
सांगली जिल्ह्यातील तासगाव एसटी डेपोमध्ये काम करणाऱ्या एका चालकाचा हा अर्ज आहे. या अर्जावर ‘गौतमी पाटील गावात येणार आहे म्हणून दोन दिवस रजा मिळावी’ असे लिहीले आहे. या सुटीच्या अर्जावरून संबंधित कर्मचारी सोशल मिडियावर चांगलाच गाजत आहे. सोबतच सांगलीसह एसटीच्या महाराष्ट्रातील सर्वच विभागांमध्ये या सुटीच्या अर्जाची चर्चा आहे. मे महिन्यातलाच हा अर्ज असल्याचे त्यावर स्पष्ट नमूद आहे. गौतमी पाटीलचा डान्स बघण्यासाठी नाईट शिफ्टला दांडी मारण्याचे अनेक प्रकार गेल्या काही महिन्यांमध्ये निदर्शनास आले. पण डान्स बघायचा आहे म्हणून थेट सुटी मागण्याचा प्रकार पहिल्यांदाच होत आहे.
चालक खरा, अर्ज खोटा
अर्जावर ज्या चालकाचे नाव आहे तो तासगाव एसटीमध्ये नोकरीला आहे. पण त्याने अश्याप्रकारचा कुठलाही अर्ज लिहीलेला नाही व कार्यालयात देखील असा कुठलाच अर्ज आला नाही, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे अर्जावरील नावाची व्यक्ती अस्तित्वात असली तरीही संबंधित अर्ज पूर्णपणे खोटा आहे, असे स्पष्ट झाले आहे.
उगाच बदनामी
ज्या चालकाच्या नावाने हा अर्ज तयार करण्याचा खोडसाळपणा झालेला आहे त्या व्यक्तीचा अकारण बदनामीचा सामना करावा लागत आहे. गौतमी पाटीलचा डान्स बघण्यासाठी सुटी मागण्यावरून संबंधित चालकाच्या नावाने विनोद तयार होत आहेत. त्यामुळे सोशल मिडियावरील हा खोडसाळपणा चालकासाठी त्रासदायक ठरत आहे.
Dancer Gautami Patil Program Leave Application Viral