अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकीकडे गौतमी पाटीलने ठेका धरला आहे आणि दुसरीकडे पोलीस प्रेक्षकांवर लाठीमार करीत आहे, असे चित्र बुधवारी वेळापूर (जि.अहमदनगर) येथे बघायला मिळाले. गौतमीच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी थांबत नसल्याने पोलिसांना लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.
गौतमी पाटीलचा कार्यक्रम होणार म्हटल्यावर आयोजकांपेक्षा जास्त तयारी पोलिसांनाच करावी लागते. परिस्थिती कधी हाताबाहेर जाईल आणि कधी पोलिसांना अॅक्टीव्ह व्हावे लागेल, याची खात्री नसते. कधी प्रेक्षक नोटा उधळतात, कधी हुल्लडबाजीने त्रस्त करून सोडतात, तर कधी कार्यक्रम स्थळाच्या क्षमतेपेक्षा प्रेक्षकांची संख्या वाढलेली असते. एखाद्या मंत्र्याच्या कार्यक्रमासारखा बंदोबस्त पोलिसांना ठेवावा लागतो. वेळापूर येथेही असाच प्रकार घडला.
येथील अर्धनारी नटेश्वर यात्रा समितीच्या वतीने विराट पालखी मैदानावर गौतमीच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंढरपूर आणि माळशिरस जवळ असल्याने येथून गौतमीचे हजारो चाहते वेळापूरमधील पालखी मैदानावर दाखल झाले होते. कार्यक्रम शांततेत सुरू झाला, पण दुसऱ्याच गाण्याला प्रेक्षकांनी हुल्लडबाजी सुरू केली. पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला. तरीही प्रेक्षक ऐकेचना. गौतमीच्या एन्ट्रीला मोबाईल टॉर्च लावून तिचे स्वागत झाले. पण तिच्याही गाण्याच्या वेळी हुल्लडबाजी सुरूच होती.
त्यामुळे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आणि त्यांनी कार्यक्रम मध्येच थांबवून शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र गौतमीच्या अदांवर पेटून उठलेले चाहते काही ऐकायला तयार नव्हते. शेवटी पोलिसांना सौम्य लाठीमार करावाच लागला. गौतमीच्या गाण्यावर सामूहिक नृत्य करणाऱ्या प्रेक्षकांना पोलिसांच्या लाठ्या बसल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
आणि प्रेक्षक शांत झाले
पोलिसांनी वारंवार आवाहन करूनही प्रेक्षक शांत व्हायला तयार नव्हते. हुल्लडबाजी सुरूच होती. त्यांच्यावर लाठीमारही करावा लागला. त्यानंतर संपूर्ण कार्यक्रमाचे ड्रोनद्वारे शुटींग होणार असून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाईल, असे पोलिसांनी सांगितले आणि त्यानंतर प्रेक्षक शांत झाले.
त्या घटनेनंतर व्हॅनिटीचा वापर
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडियो सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. त्या घटनेने गौतमीला मोठा धक्का बसला. त्यामुळे आता ती आयोजकांना व्हॅनिटी व्हॅन किंवा चार भिंती आणि वरून छत असलेल्या पक्क्या खोलीची डिमांड करते.
इंदोरीकर महाराजांचा गैरसमज
तीन गाण्यांचे तीन लाख मिळतात, असा आरोप इंदोरीकर महाराजांनी गौतमीवर केला होता. पण हा महाराजांचा गैरसमज असल्याचे गौतमी म्हणते. एवढे पैसे द्यायचे असतील तर आयोजक मोठ्या हिरोईन्सला बोलावतील, असे गौतमीचे म्हणणे आहे.
बाहेरच्या राज्यांमध्ये डिमांड
गौतमी पाटील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोकप्रिय होत असताना आता तिला बाहेरच्या राज्यांमधूनही मागणी येऊ लागली आहे. काही राज्यांमध्ये तिला कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. पण जायचे की नाही, याबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याचे ती म्हणते.
Dancer Gautami Patil Program Lathi charge