इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लावणी कलाकार म्हणून गौतमी पाटील चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. असे कार्यक्रम करण्यासाठी ती मोठीच्या मोठी रक्कम आकारते. तिच्या या कार्यक्रमांना चांगलीच गर्दी देखील होते. इतकी की आतापर्यंत अनेकदा तिच्या कार्यक्रमांना झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. तिच्या एका कार्यक्रमासाठी तिला मिळणाऱ्या मानधनावरून अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. मात्र, आपल्या कार्यक्रमासाठी मोठं मानधन आकारणाऱ्या या लावणी कलाकाराला लावणी कशी असते हेच ठाऊक नाही, आहे की नाही गंमत?
मी कधीच पूर्णपणे लावणी करत नाही
गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांवर, नाचावर टीका होत असली तरी तिची लोकप्रियता काही कमी होत नाही. तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होते. नुकतीच तिने एक मुलाखत दिली. त्यातील उत्तरावरून ती वादात सापडली आहे. @theoddEngineer या चॅनेलवर झालेल्या मुलाखतीत गौतमीला “तू तमाशा करते का लावणी?” असा थेट प्रश्न विचारण्यात आला होता.
त्यावर गौतमी म्हणते, “मी पूर्णपणे लावणी करतच नाही त्यामुळे माझ्या शो ला लावणीचा कार्यक्रम म्हणायची गरज नाही. तो एक डीजे शो आहे. मी लावणीच्या एखाद्या गाण्यावर नृत्य करते. माझ्या शोमधील सहकलाकारसुद्धा एक दोन लावण्या घेतात पण इतर गाणी ही मराठी हिंदी सिनेमाची असतात. मी माझ्या करिअरची सुरुवात लावणीपासूनच केली असली तरी मी लावणीचे प्रशिक्षण घेतलेले नाही, त्यामुळे लावणी कशी असते याचा मी अभ्यास केलेला नाही.” गौतमीचे हे उत्तर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते आहे. विशेष म्हणजे अनेक तमाशा कलावंतांनी गौतमीच्या डान्सला लावणी म्हणण्यावर आक्षेप घेतला होता.
Dancer Gautami Patil on Lavani Training