पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या मनोरंजन क्षेत्रात काय आणि त्याव्यतिरिक्त काय केवळ आणि केवळ गौतमी पाटील हिचीच चर्चा असते. तिच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी, तिथे प्रेक्षक घालत असलेला धुडगूस, त्यावरची तिची प्रतिक्रिया या सगळ्याच गोष्टींची अलीकडे चर्चा असते. आता तर तिने स्वतःच तिच्या लग्नाच्या चर्चांना सुरुवात केली आहे. बारामती येथील माळेगावच्या येळेढाळेमध्ये लावण्यांचा खास कार्यक्रम पार पाडला. तेव्हा तिनेच स्वतःच्या लग्नाचे सुतोवाच केले.
योग्य मुलगा मिळाला की करणार लग्न
या कार्यक्रमात नेहमीप्रमाणेच प्रेक्षकांची गर्दी होती. अनेक मराठी लावण्यांवर गौतमीने नृत्य केलं. सध्या माझ्या कार्यक्रमांना तुफान प्रतिसाद मिळतो आहे. जाईल तिथे लोक माझ्या कार्यक्रमांना खूप चांगला प्रतिसाद देत असल्याचे गौतमी सांगते. माता-माऊल्यांचं प्रेम मिळतंय. तरुण गर्दी करतात. अशात तर लग्नाचा विचार नाहीये. पण अनुरुप मुलगा मिळाला की मी लग्न करेन. मग, जसा माझ्या कार्यक्रमात राडा करता तसा माझ्या लग्नातही करा, असं गौतमी पाटील म्हणाली. सध्या तरी माझा लग्नाचा विचार नाही. पण लवकरच मी लग्न करेन. तुम्हा सगळ्यांना लग्नाचं निमंत्रण देईन, असाही तिने सांगितलं.
शांततेत पडला कार्यक्रम पार
बारामती तालुक्यातील माळेगाव येथील येळेढाळे वस्तीत श्री लक्ष्मीआई यात्रेच्या निमित्ताने गौतमी पाटील यांच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. यात्रा कमिटीने केलेले चोख नियोजन, पोलीस निरीक्षक किरण अवचर आणि सहकारी पोलिसांनी ठेवलेला बंदोबस्त यामुळे नेहमी गोंधळ, राडा होणारा कार्यक्रम शांतपणे पार पडला. यावेळी दहा हजारांहून अधिक जनसमुदाय उपस्थित होता. विशेषतः महिलांची संख्या अधिक होती. ‘सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम’, ‘पाव्हणं जेवला का’, ‘बाई मी ऐवज हवाली केला’, ‘पाटलांचा बैलगाडा’, या गाण्यांसह थेट महिला वर्गासमोर जाऊन गौतमी पाटील यांनी केलेल्या नाचला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Dancer Gautami Patil First time Answer on Wedding