नवी दिल्ली – देशांतर्गत डाळींचा साठा करण्याबाबतच्या मर्यादा दूर करण्यात आल्याचा संदेश व्हॉट्सअपवरून पाठविला जात आहे. या संदर्भात असे स्पष्ट करण्यात आले आहे का, २ जुलै २०२१ च्या आदेशानुसार शिल्लक डाळींवर साठवणुकीची असलेली मर्यादा हटविण्यात आलेली नसून ती मर्यादा कायम आहे. राज्यांकडून होणाऱ्या या आदेशांच्या अंमलबजावणीवर केंद्र सरकार बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालयाने दिली आहे.
केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या पोर्टलवर स्टॉकिस्टद्वारे जाहीर करण्यात आलेला साठा तसेच बँकेकडून घेतले गेलेले कर्ज किंवा आयातदारांकडून आयात केलेले प्रमाण यात अनेकदा तफावत आढळत असल्याचे केंद्र सरकारने राज्यांना कळवले आहे. स्टॉक मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यास राज्यांना सांगण्यात आले आहे.