नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत कोरोनाचा झालेला फैलाव आणि निर्माण झालेली गंभीर परिस्थितीची सगळीकडे चर्चा होत आहे. मात्र, यातच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीत कोरोनाला मात देणाऱ्या रुग्णांची संख्या विक्रमी स्तरावर वाढलेली आहे. गेल्या एका आठवड्यात १ लाख ३३ हजार रुग्ण बरे झाले आहेत. अशाच रितीने रुग्णांची संख्या कमी झाली तर आगामी काही दिवसात कोरोनारुग्णांमध्ये लक्षणीय घट होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यापासून सात दिवसात सव्वा लाखांहून अधिक रुग्ण बरे झाल्याची ही घटना प्रथमच घडली आहे. १५ एप्रिलपर्यंत बरे झालेल्यांची संख्या ७,१८,१७६ होती. २२ एप्रिलला बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून ८,५१,५३७ इतकी झाली आहे. १५ एप्रिलनंतर दररोज रुग्ण बरे होण्याचा आकडा वाढू लागला आहे. २१ एप्रिलला एकाच दिवसात २४,६०० रुग्ण बरे झाले आहेत.
त्यामुळेच कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढत असला तरी दिल्लीत बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के कायम राहिले आहे. तरीही बाधितांचा आकडा ज्या वेगाने वाढतोय ते पाहता बरे होणार्यांचे प्रमाण अजूनही कमीच आहे.
रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढणे ही दिलासादायक बाब आहे. विषाणूचा प्रादुर्भाव भलेही वेगाने होत असला तरी रुग्णसुद्धा झपाट्याने बरे होत आहेत, असे डॉ. अंजली सक्सेना यांनी सांगितले. बरे होणार्यांची संख्या काही दिवसांपासून वाढत आहे. पंरतु सध्या संसर्ग रोखणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, तसेच घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन डॉ. विजय दत्ता यांनी केले आहे.
—
आकडेवारी अशी
तारीख बरे झालेले रुग्ण
२२ एप्रिल १९,६०९
२१ एप्रिल २४,६००
२० एप्रिल १९,४३०
१९ एप्रिल २१,५००
१८ एप्रिल २०,१५९
१७ एप्रिल १५,४१४
१६ एप्रिल १२,६४९