नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रतिदिवस प्रमाणे ठराविक दिवसांसाठी योग्य वेळेत घ्यावी लागणारी औषधांची मात्रा एकच कॅप्सूल घेऊन मिळवता येऊ शकते, त्यासाठी रोज ठराविक वेळेत औषध घेण्याची गरज भासणार नाही, ही अनोखी संकल्पना संशोधनातून मांडली आहे मेडिकल कॉलेजच्या सौरभ सरगर आणि त्याच्या संघाने. याच संशोधनाला राष्ट्रीय पातळीवर प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
नाशिक येथील एसएमबीटी मेडिकल कॉलेजच्या प्रथमवर्ष एमबीबीएस विद्याशाखेत शिक्षण घेत असलेल्या सौरभ सरगर याने संशोधन प्रकल्प सादर करत प्रथम क्रमांक पटकावला. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस (UCMS) दिल्ली आणि सेठ जी एस मेडिकल कॉलेजचे संशोधन विभाग (MICE LAB) यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली येथे राष्ट्रीय मेडिकल हॅकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सौरभच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्पर्धेच्या नियमांनुसार, १२ वेगवेगळ्या विषयांवर देशभरातील बहु-विद्याशाखीय विद्यार्थ्याना नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प सादर करण्यासाठी सांघिक प्रवेशिका सादर करणे अनिवार्य करण्यात आले होते. देशभरातून आलेल्या प्रवेशिकांमधून ११ प्रवेशिका अंतिम फेरीसाठी निवडल्या गेल्या. नाशिक येथील एसएम बी टी मेडिकल कॉलेजमधील एम बी बी एस प्रथमवर्षातील विद्यार्थी सौरभ सरगर आणि त्याच्या संघाने सादर केलेल्या “एन्टेरिक म्युको अढेजीव्ह कोटेड कॅप्सुल” या थ्रीडी ऍनिमेटेड प्रकल्प सादरीकरणाने प्रथम क्रमांक पटकावला.
प्रतिदिवस प्रमाणे ठराविक दिवसांसाठी योग्य वेळेत घ्यावी लागणारी औषधांची मात्रा एकच कॅप्सूल घेऊन मिळवता येऊ शकते, त्यासाठी रोज ठराविक वेळेत औषध घेण्याची गरज भासणार नाही ही संकल्पना या संशोधनातून मांडण्यात आली. या संशोधनासाठी सौरभ आणि त्याच्या संघाच्या सादरीकरणाने घवघवीत यश मिळवले.
सौरभच्या मेडिकल कॉलेजमधील प्रथम वर्षातच नाविन्यपूर्ण संशोधन कल्पनेचे आणि अपार मेहनतीचे एसएमबीटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डॉ. मीनल मोहगावकर यांनी कौतुक केले. तसेच सौरभच्या संशोधनातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छादेखील दिल्या आहेत.
Daily Medicines Dose Medical Student Research
SMBT Hospital Nashik
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD