नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून नाशिकमध्ये जळगावहून ६८ वर्षापासून प्रकाशित होणा-या दैनिक जनशक्तीच्या नाशिक आवृत्तीचा प्रकाशन सोहळा आज नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, महापौर सतीश कुलकर्णी, जळगावचे आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता व्दारका येथील खरबंदा पार्क येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्या निमित्त १६ महिन्यात तब्बल ३ कोटी २५ लाख दर्शकांनी पसंती दिलेल्या इंडिया दर्पण व जनशक्ती ही दोन माध्यमे एकत्र येत आहे. हा महाराष्ट्रातला पहिला प्रयोग आहे. नव्याने सुरु झालेले वेब न्यूज पोर्टल व एक दैनिक एकत्र आल्यामुळे हार्ड कॅापी बरोबरच डिजीटल न्यूज वाचकांना मिळणार आहेत.
उत्तर महाराष्ट्रातील आघाडीचे दैनिक म्हणून जनशक्ती प्रसिध्द आहेच. दैनिक जनशक्ती जळगाव, धुळे, नंदूरबार येथून एकाचवेळी अखंडपणे प्रकाशित होत आहे. आता नाशिकमध्ये तो सुरु झाल्यामुळे एकुणच उत्तर महाराष्ट्रातील चारही जिल्हयाच्या बातम्या यात असणार आहे. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात खान्देशमधील रहिवाशी येथे वास्तव करतात. त्यामुळे त्यांना नाशिकबरोबरच या बातम्या एकत्रित या विभागीय दैनिकातून वाचता येणार आहे. जळगावहून प्रकाशित होणारे दैनिक जुने असून त्यांची परंपरा मोठी आहे. तर इंडिया दर्पण न्यूज पोर्टलमुळे नाशिकमध्ये काय घडते हे सहज वाचकांना कळते. सतत अपडेट असल्यामुळे त्याची माहिती क्षणात मिळते. त्याचप्रमाणे बातम्यात विश्वासार्हता असल्यामुळे त्या वाचनीय असतात. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातला हा पहिला प्रयोग कौतुकास्पद असणार आहे.
खरं तर कोरोना काळात उद्योग व व्यवसायावर मोठा परिणाम झाला. त्यात प्रसार माध्यमे वाचली नाही. त्यांच्यावरही मोठा आघात झाला. अनेक मोठ्या वृत्तसंस्था अडचणीत आल्या. तर देशभरात अनेक पत्रकारांनी आपल्या नोक-या गमावल्या. पण, अशा स्थितीत नवीन मार्ग इंडिया दर्पणने वेगळी वाट शोधली. त्याला वाचकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्यामुळे १६ महिन्यात या पोर्टलला ३ कोटी २५ दर्शकांनी पसंती दिली. एका जिल्हयातील पोर्टलला व त्यात कोणताही ब्रॅण्ड नसतांना इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळणे तसे अवघड. पण, ते या पोर्टलला मिळाले. त्यामुळेच इंडिया दर्पणच्या या यशात भर घालण्यासाठी जळगावहून ६८ वर्षापासून प्रकाशित होणा-या दैनिक जनशक्तीने जॅाइंट व्हेंजर करुन त्यांच्या सहकार्याने नाशिकमध्ये अंक सुरु करण्याचा निश्चय जनशक्तीने केला. आज या दोन्ही माध्यमाचे एकत्रीत हे दैनिक प्रकाशित होत आहे. या प्रकाशन सोहळ्यास सर्वांनी उपस्थितीत रहावे असे आवाहन दैनिक जनशक्तीचे संपादक योगेश्वर (यतीन) ढाके, निवासी संपादक डॅा. युवराज परदेशी, व्यवस्थापक धन्यकुमार जैन, इंडिया दर्पणचे संपादक गौतम संचेती, कार्यकारी संपादक भावेश ब्राह्मणकर, सााहित्य व सांस्कृतिक संपादक देवीदास चौधरी, जाहिरात व्यवस्थापक राहुल भदाणे यांनी केले आहे.