नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोना काळात १६ महिन्यात तब्बल ३ कोटी २५ लाख दर्शकांची पसंती मिळालेल्या इंडिया दर्पण न्यूज पोर्टलच्या हातात घेऊन ६८ वर्षे जुने दैनिक जनशक्ती नाशिकमध्ये सुरु होत आहे. ही अतिशय अभिमानाची बाब आहे. वाचकांना हार्ड कॅापी बरोबरच डिजीटल बातम्याही वाचायला मिळणार आहेत. जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांबरोबरच नाशिकच्या बातम्या त्याचबरोबर राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा वेध दै. जनशक्तीमध्ये वाचकांना मिळेल. विशेष म्हणजे नाशिकचे पहिले विभागीय आणि सर्व तयारीने सुरू झालेली दै. जनशक्तीची आवृत्ती ही यशस्वीच होईल, असे कौतुकोद्गार पालकमंत्री आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काढले. भुजबळ यांच्या हस्ते दै. जनशक्तीच्या नाशिक आवृत्तीचे प्रकाशन आज येथे झाले.
यावेळी भुजबळ म्हणाले की, उत्तर महाराष्ट्राची राजधानी नाशिक आहे. या राजधानीत आता दै. जनशक्तीने पाऊल टाकले आहे. मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून हे दैनिक नाशिकमध्ये सुरु होत आहे ही आनंददायी बाब आहे. वर्तमानपत्रात आता जो जे वांछिल तो ते लाहो असा ट्रेंड आहे. त्यामुळे वाचकांना जे आवडेल ते दिले जाते. वाचकांच्या आवडीचे विषय प्रत्येक पानात दिसू शकेल. दैनिक जनशक्तीने निर्भिडपणे लिखाण करावे, लोकांपुढे सत्य गेले पाहिजे. पण, बातमीत मत येता कामा नये, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळत नसल्याच्या विषयावरही आपले मत मांडेल. ते म्हणाले की, दाक्षिणात्य तामिळ, कन्नडसह अनेक भाषांना अभिजात दर्जा मिळाला. पण, मराठीला तो अद्याप मिळाला नाही. मराठी ही भाषेची उपभाषा नाही. ती प्राचिन व समृध्द अशी भाषा आहे. त्यामुळे तिला तो दर्जा मिळावा यामागील कारण कळत नाही. दिल्लीमध्ये महाराष्ट्र व मराठी बद्दल असलेले मत याबद्दलही त्यांनी यावेळी खंत व्यक्त केली.
इंडिया दर्पणचे कार्यकारी संपादक भावेश ब्राह्मणकर यांनी इंडिया दर्पणच्या वाटचालीचा आढावा घेतला. तर दै. जनशक्तीचे निवासी संपादक डॉ. युवराज परदेशी यांनी ६८ वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी दै. जनशक्तीचे मुख्य संपादक यतीन ढाके यांनी भुजबळांचा सत्कार केला. तर इंडिया दर्पणचे संपादक गौतम संचेती यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाचे संयोजन व्यवस्थापक धन्यकुमार जैन, सााहित्य व सांस्कृतिक संपादक देविदास चौधरी, जाहिरात व्यवस्थापक राहुल भदाणे यांनी केले. जगदीश देवरे यांनी आभार मानले. नाशिक आवृत्तीच्या नमी उमेद या स्टार्टअप विशेषांकाचे लेखन करणारे प्रा. डॉ. प्रसाद जोशी यांचा सत्कार भुजबळांच्या हस्ते करण्यात आला.
महाराष्ट्रातला हा पहिला प्रयोग कौतुकास्पद
उत्तर महाराष्ट्रातील आघाडीचे दैनिक म्हणून जनशक्ती प्रसिध्द आहेच. दै. जनशक्ती जळगाव, धुळे, नंदूरबार येथून एकाचवेळी अखंडपणे प्रकाशित होत आहे. आता नाशिकमध्ये तो सुरु झाल्यामुळे एकूणच उत्तर महाराष्ट्रातील चारही जिल्ह्याच्या बातम्या यात असणार आहे. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात खान्देशमधील रहिवाशी येथे वास्तव करतात. त्यामुळे त्यांना नाशिकबरोबरच या बातम्या एकत्रित या विभागीय दैनिकातून वाचता येणार आहे. जळगावहून प्रकाशित होणारे दैनिक जुने असून त्यांची परंपरा मोठी आहे. तर इंडिया दर्पण न्यूज पोर्टलमुळे नाशिकमध्ये काय घडते हे सहज वाचकांना कळते. सतत अपडेट असल्यामुळे त्याची माहिती क्षणात मिळते. त्याचप्रमाणे बातम्यात विश्वासार्हता असल्यामुळे त्या वाचनीय असतात. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातला हा पहिला प्रयोग कौतुकास्पद असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थितांनी यावेळी दिल्या.
बघा प्रकाशन सोहळ्याचा हा व्हिडिओ
https://www.facebook.com/eJanshakti/videos/456858856181148/?extid=WA-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C