मुंबई – ऐन दिवाळीच्या सणात शिवसेनेसाठी अत्यंत आनंददायी बातमी आहे. शिवसेनेचे विजयी सिमोल्लंघन झाले आहे. दादरा-नगर हवेली येथील लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर या विजयी झाल्या आहेत. यामुळे महाराष्ट्राबाहेर प्रथमच शिवसेनेचा खासदार विजयी झाला आहे.
पोटनिवडणुकीत डेलकर यांना १ लाख १६ हजार ८३४ तर भाजपचे उमेदवार महेश गावित यांना ६६ हजार १५७ मते मिळाली. त्यामुळे डेलकर यांनी गावित यांचा ५० हजार मतांनी पराभव केला आहे. माजी अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्याने या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. कलाबेन डेलकर यांनी निवडणुकीच्या काही दिवसापूर्वीच शिवसेनेत प्रवेश करुन शिवबंधन बांधले होते. शिवसेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची करुन तेथे जोरदार प्रचार अभियान राबविले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह अनेत नेत्यांच्या सभा येथे घेण्यात आल्या.
शिवसेनेचे आमदार विजयी
महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा अद्याप खासदार विजयी झालेला नाही. डेलकर यांच्या रुपाने पहिला खासदार महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा असणार आहे. यापूर्वी शिवसेनेचा आमदार महाराष्ट्राबाहेर निवडून आला होता. १९९१ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये पवन पांडे हे शिवसेनेचे आमदार विजयी झाले होते. त्यानंतर ३ दशकांनंतर महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचे विजयी सीमोल्लंघन झाले आहे.
समीकरण बदलणार
डेलकर विजयी झाल्यानंतर शिवसेनेचे लोकसभेतील संख्याबळ हे १८ वरुन १९ झाले आहे. त्यामुळे शिवसेना लोकसभेत सहाव्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. शिवसेनेपुढे डीएमके (२४), तृणमूल (२२), वायएसआर काँग्रेस (२२) हे पक्ष आहेत.
https://twitter.com/rautsanjay61/status/1455420346597707776