मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा आज मालेगावात होत आहे. शिवसेना हे नाव आणि पक्ष शिंदे गटाला गेल्यानंतर ठाकरे यांनी रामदास कदम यांच्या खेड येथे पहिली सभा घेतली. त्यानंतर आता दुसरी सभा मालेगावात होत आहे. शिंदे-फडणीव सरकारमधील मंत्री दादा भुसे हे मालेगाव बाह्य मतदारसंघाचे आमदार आहेत. आणि आता उद्धव यांची येथे सभा होत आहे. या सभेसाठी मालेगावात उर्दू होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. त्यामुळे त्याची राज्यभर चर्चा होत आहे. आता यासंदर्भात दादा भुसे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
उद्धव यांच्या आजच्या सभेबद्दल दादा भुसे म्हणाले की, आम्ही आमचे काम चोखपणे करीत आहेत. सर्वच मतदारांच्या आम्ही संपर्कात आहो. त्यातच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेनुसार आम्ही काम करीत आहोत. त्यामुळे आम्हाला कसलीही भीती नाही. निवडणुकीत कुणाला निवडून द्यायचे हे जनतेला माहित आहे. मालेगावच्या जनतेचा तो अधिकार आहे. जनताच सगळ्या गोष्टीचे उत्तर देईल, असे भुसे यांनी म्हटले आहे.
हिरेंचेही जोरदार शक्तीप्रदर्शन
भाजपला सोडचिठ्ठी देत अद्वय हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. एकेकाळी मालेगाव हा हिरे घराण्याचा बालेकिल्ला होता. याच बालेकिल्ल्याला दादा भुसे यांनी सुरूंग लावला. आणि आता याच भुसेंना आस्मान दाखविण्यासाठी हिरेंनी चंग बांधला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या निमित्ताने हिरे हे जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आहेत. त्यामुळे मालेगावात हिरे कमबॅक करणार का, अशी चर्चा रंगत आहे.
Dada Bhuse Reaction on Malegaon Uddhav Thackeray Sabha