मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक विषय म्हणून शिकवण्यात येत असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भविष्यातील ‘अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट’ या मूल्यमापनाच्या संकल्पनेचा विचार करुन आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार भाषिक धोरणाची अंमलबजावणी केली जाईल. यामध्ये तृतीय भाषा म्हणून कोणतीही भाषा बंधनकारक नसून हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक असतील, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले.
मंत्री भुसे यांनी मंत्रालयात पत्रकारांशी संवाद साधला. शालेय शिक्षण विभागाचे आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यावेळी उपस्थित होते. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले, इंग्रजी भाषा ही अनेक वर्षांपासून राज्यमंडळाच्या शाळांमध्ये द्वितीय भाषा म्हणून स्वीकृत असून इतर मंडळांच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इंग्रजी भाषेसोबत मराठी आणि हिंदी भाषा शिकविण्यात येतात. राज्य सरकारने तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही सक्ती न करता पालक व विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार भारतीय भाषांमधून निवड करण्याचा पर्याय दिला आहे. कोणतीही विशिष्ट तिसरी भाषा शिकण्याची सक्ती नाही. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) २०२२ मधील शालेय वेळेच्या नियोजनानुसार प्रथम भाषेस (मराठी) साप्ताहिक १० तासिका सुचविल्या असून राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) २०२४ मधील शालेय वेळेच्या नियोजनानुसार प्रथम भाषेसाठी (मराठी) साप्ताहिक १५ तासिका समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. तसेच तिसऱ्या भाषेसाठी साप्ताहिक फक्त पाच तासिका सुचविलेल्या आहेत. ज्या भाषेसाठी किमान २० विद्यार्थ्यांची मागणी असेल, त्या भाषेसाठी शिक्षक नियुक्त केले जातील. तसेच २० पेक्षा कमी विद्यार्थ्यांकरिता डिजिटल शिक्षण सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. इयत्ता पहिली आणि दुसरी मध्ये चित्र, गाणी, बडबड गीतांद्वारे आनंददायी मौखिक शिक्षण दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात युडायस 2024-25 नुसार विविध माध्यमांच्या एकूण 1,08,157 शाळा सुरू आहेत. यामध्ये 2,11,79,673 विद्यार्थी शिक्षण घेत असून शिक्षकांची संख्या 7,43,948 इतकी आहे. यातील मराठी माध्यमांच्या 85,702 शाळा असून त्यात 1,27,61,364 विद्यार्थी आणि 4,558,100 शिक्षक आहेत. इंग्रजी माध्यमांच्या 15,118 शाळांमध्ये 66,89,059 विद्यार्थी आणि 2,34,769 शिक्षक आहेत. हिंदी माध्यमाच्या 5,096 शाळांमध्ये 12,52,423 विद्यार्थी आणि 37,629 शिक्षक आहेत. उर्दू माध्यमाच्या 1600 शाळांमध्ये 4,02,706 विद्यार्थी आणि 13,313 शिक्षक आहेत. गुजराती माध्यमाच्या 322 शाळांमध्ये 33,230 विद्यार्थी आणि 1,366 शिक्षक आहेत. कन्नड माध्यमाच्या 179 शाळांमध्ये 30,308 विद्यार्थी आणि 1,310 शिक्षक, तमिळ माध्यमाच्या 55 शाळांमध्ये 3,997 विद्यार्थी आणि 188 शिक्षक, तेलगु माध्यमाच्या 43 शाळांमध्ये 1,799 विद्यार्थी आणि 118 शिक्षक तर सिंधी माध्यमाच्या 8 शाळांमधून 1,233 विद्यार्थी शिक्षण घेत असून शिक्षकांची संख्या 33 असल्याची माहिती मंत्री भुसे यांनी यावेळी दिली.