नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : जिल्ह्यात अतिवृष्टीने बाधित कुटुंबांना जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी. वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी पथकांची नियुक्ती करावी, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.
नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी मंत्री श्री. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांच्यासह वीज वितरण कंपनी, पशुसंवर्धन, कृषि, जलसंपदा व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते, तर जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले होते.
मंत्री श्री. भुसे म्हणाले की, राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंब बाधित झाले आहेत. काहींच्या पशुधनाचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत सर्व संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करीत बाधित कुटुंबांना दिलासा द्यावा. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज कंपनीने पथके गठित करावीत. वीज तारा, नादुरुस्त ट्रान्स्फॉर्मर बदलून वीज पुरवठा पूर्ववत करावा.
पडझड झालेली घरे, शेतपिकांच्या नुकसानाचे पंचनामे करून तातडीने अहवाल सादर करावेत जेणेकरून बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे सुलभ होईल. बहुतांश नदी- नाल्यांना पूर आला आहे. तो ओसरल्यानंतर उद्भवणारे साथीचे आजार रोखण्यासाठी आरोग्य आणि पशुसंवर्धन विभागाने पुरेशी दक्षता घेत आवश्यक उपाययोजना कराव्यात. त्यासाठी आवश्यक औषधे उपलब्ध करून घ्यावीत. ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल याची काळजी ग्रामपंचायतीने घ्यावी. तसेच खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशाही सूचना मंत्री श्री. भुसे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी सांगितले की, जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात येत आहे. बाधितांना मदतीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा प्रशासन सतर्क असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी माजी खासदार हेमंत गोडसे, सामाजिक कार्यकर्ते अजय बोरस्ते आदी उपस्थित होते.