नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज त्र्यंबेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या हिवाली येथील शाळेला भेट दिली. शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेत शिक्षक व विद्यार्थ्यांचे मंत्री भुसे यांनी कौतुक केले.
यावेळी गट विकास अधिकारी गजानन लेंडी, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. नितीन बच्छाव, उप शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर कानोज, शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते अजय बोरस्ते, गट शिक्षणाधिकारी मनोहर सूर्यवंशी, सरपंच माया बागुल यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. मंत्री भुसे म्हणाले की, शाळेचे उपक्रम कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहेत. या शाळेला जोडण्यात येणाऱ्या रस्त्यांसह पायाभूत सोयीसुविधा पुरविल्या जातील, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना उद्यापासून सुरु होणाऱ्या नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
हिवाली येथील ही शाळा वर्ष २०१६ पासून सकाळी ७.३० ते रात्री ८.३० पर्यंत ३६५ दिवस भरते. शाळेत शालेय शिक्षणासह विविध व्यावसायिक उपक्रमांसह शिकविले जातात. त्यामुळे विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने शाळेत येवून येथेच १२ तासापेक्षा अधिक वेळ येथे रमतात. शाळेतील वर्गखोल्या विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेल्या शैक्षणिक साहित्याची सुबकपणे केलेल्या मांडणीतून सजलेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार शालेय शिक्षण साहित्याची सांगड घातलेली विद्यार्थ्यांची कल्पकता येथे पहावयास मिळते, अशी माहिती शिक्षक केशव गावित यांनी दिली.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी तीन अंकी संख्यांचे पाढे बोलणे, इंग्रजी लिखाण, तोंडपाठ भारतीय राज्यघटनेचे कलम, दोन्ही हातांनी एकावेळी लिखाण करणे यासह इतर उपक्रम क्षणात उपस्थितांना करून दाखविल्या.