नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानत शिक्षण विभाग, शैक्षणिक क्षेत्रातील विचारवंतांशी संवाद साधत राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षणाला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी येथे सांगितले.
मंत्री श्री. भुसे आज मुंबई येथे मंत्रालयात नाशिक जिल्ह्यातील विविध शाळेतील ५० विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागाचा पदभार स्वीकारणार आहेत. या विद्यार्थ्यांशी मंत्री श्री. भुसे यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात संवाद साधला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी नाशिक विभागाचे महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, शिक्षण विभागाचे उपसंचालक बी. बी. चव्हाण, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले की, राज्यात पहिली ते बारावीपर्यंत चे सव्वा दोन कोटी विद्यार्थी आहेत. एक लाखावर शाळा असून साडेसात लाखांवर शिक्षक, अधिकारी व कर्मचारी आहेत. शिक्षण विभागाच्या माध्यमातून गरिबातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यालाही गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आणि आनंददायी शिक्षण मिळाले पाहिजे हीच राज्य शासनाची भूमिका आहे. त्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न केले जातील. आवश्यक तेथे सुधारणा केल्या जातील. शिक्षण विभागाला सूचना देत कृती आराखडा तयार करण्यात येईल. त्यासाठी पालक, शिक्षक, विचारवंतांशी संवाद साधला जाईल. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षकांशी संवाद साधण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यात आदर्श शाळांची संख्या दोनशेवर पोहोचली आहे. जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये विविध योजनांच्या माध्यमातून कुंपण, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, शाळा दुरुस्तीची कामे, ई- सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच स्काऊट आणि गाइडचे विद्यार्थी २६ जानेवारी २०२५ रोजी नव्या गणवेशात उपस्थित राहतील, अशा प्रकारचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले. त्यानंतर मंत्री श्री. भुसे विद्यार्थ्यांसह मुंबईकडे रवाना झाले. तत्पूर्वी मंत्री श्री. भुसे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला.