नवी दिल्ली/भुवनेश्वर – दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले आहे. ‘जवाद’ असे या चक्रीवादळाला नाव देण्यात आले असून त्याने अनेक राज्यांची चिंता वाढवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चक्रीवादळामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीचा आणि राज्यांच्या तयारीचा आढावा घेतला. यादरम्यान त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारांच्या संस्थांना मदत आणि बचावकार्य संदर्भात निर्देश दिले.
कॅबिनेट सचिवांकडून आढावा
कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी बैठक घेऊन प्रभावित क्षेत्रांतून सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचे तसेच मच्छिमारांच्या नौका समुद्रातून हटविण्याचे निर्देश दिले. बैठकीत ओडिशा, आंध्र प्रदेश, बंगाल आणि अंदमान निकोबार येथील मुख्य सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी व्हीसीद्वारे सहभागी झाले होते. तत्पूर्वी भारतीय हवामान विभागाने ‘जवाद’ च्या शक्यतेने संपूर्ण देशात इशारा दिला आहे.
वादळ चार डिसेंबरपर्यंत किनाऱ्यावर
हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर शुक्रवारी चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. चार डिसेंबरपर्यंत हे वादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनार्यावर आदळण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचे ‘जवाद’ हे नाव सऊदी अरबने दिले आहे. उदार किंवा दयाळू असा ‘जवाद’ या अरबी शब्दाचा अर्थ आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्र म्हणाले, अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र गुरुवारी सकाळी ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतरीत झाले. येत्या १२ तासात चक्रीवादळ वायव्य दिशेकडे वेगाने कूच करेल. चार डिसेंबरपर्यंत उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनार्यावर ते आदळेल. त्यानंतर ते आपली दिशा बदलेल. आंध्र, ओडिशा आणि बंगाल या राज्यांना चक्रीवादळाचा फटका बसेल.
९५ रेल्वे रद्द, एनडीआरएफ तैनात
चक्रीवादळामुळे खबरदारी म्हणून रेल्वे विभागाने तीन आणि चार डिसेंबरला धावणार्या ९५ मेल आणि एक्सप्रेस रद्द केल्या आहेत. रेल्वे विभागाने ट्विट करून ही माहिती दिली आहे. चक्रीवादळाशी सामना करण्यासाठी सरकारी पातळीवर तयारी सुरू झाली आहे. केंद्रीय आपत्ती निवारण समितीने संभाव्य चक्रीवादळाचा आढावा घेऊन बचावकार्यासाठी भारतीय नौदल आणि लष्कराला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण दला (एनडीआरएफ) च्या ३२ पथकांना तैनात करण्यासह अतिरिक्त पथकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
या जिल्ह्यांना धोका
ओडिशामध्ये चक्रीवादळाचा परिणाम होणार्या जिल्ह्यांमध्ये गंजाम, गजपती, पुरी, नयागड, खुर्दा, जगतसिंहपूर, केंद्रपाडा, जाजपूर, ढेंकानाल, कटक, भद्रक, बालेश्वर आणि मयूरभंज यांचा समावेश आहे. तसेच ओडिशाच्या किनार्यावरील जिल्ह्यांसह आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम, विशाखापट्टणम, विजयनगरम या जिल्ह्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
असे पडले जवाद नाव
जवाद हा अरबी शब्द आहे. याचा अर्थ उदाय किंवा दयाळू असा होतो. हे नाव सऊदी अरबच्या सल्ल्यानुसार देण्यात आले आहे. हे चक्रीवादळ जास्त नुकसान करणार नाही, त्यामुळे त्याला जवाद असे नाव दिले आहे. चक्रीवादळांची नावे जगातील विविध देशांदरम्यान झालेल्या करारांतर्गत ठेवले जातात. १९५३ रोजी झालेल्या देशांतर्गत करारात १३ देश सहभागी झाले होते. हिंदी महासागर क्षेत्रात २००४ पासून ही परंपरा सुरू झाली आहे.