मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बंगालच्या उपसागरात अंदमानच्या दक्षिणेला हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असल्याने आज (7 डिसेंबरला) चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हे चक्रीवादळ तामिळनाडूची किनारपट्टी आणि पदुच्चेरीच्या उत्तरेकडे सरकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे गुरुवारी (8 डिसेंबर) आंध्र प्रदेशची किनारपट्टी, तामिळनाडू, पदुच्चेरी, कराईकल या भागात 7 ते 10 डिसेंबर दरम्यान जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. या बदलामुळे, राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्याने थंडीचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, महाराष्ट्रावर या बदलाचा विशेष असा परिणाम होणार नाही.
बंगालच्या उपसागरात हवेच्या तीव्र कमी दाब क्षेत्राला त्याच्या निर्मितीपासून पुढे ताशी 76 किमी वेगाने सरकताना प्रवासासाठी उपलब्ध समुद्रपाणी पृष्ठभाग क्षेत्र अंतर कमी मिळत आहे. हे चक्रीवादळ सध्या त्याच्या ईशान्य मान्सूनच्या नेहमीसारख्या घडणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियेसारखे पूर्व-पश्चिम साधारण 15 डिग्री अक्षवृत्त दरम्यान आग्नेयेकडून वायव्येकडे जात आहे. चक्रीवादळ वाऱ्याच्या घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरणाऱ्या स्थितीमुळे त्याच्या अतिबाहेरील परिघ – घेरातून महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येणाऱ्या आर्द्रतेच्या वक्रकार पट्ट्यातील 14 जिल्ह्यात आठवडाभर म्हणजे 9 ते 16 डिसेंबर दरम्यान ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे. वातावरणासहित उरध्व दिशेनं संवहनी प्रक्रियेतून तुरळक ठिकाणी अवकाळी बे-मोसमी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
महाराष्ट्रात थंडी ओसरली..
चक्रीवादळाच्या या स्थितीमुळे महाराष्ट्रातील थंडीवर परिणाम झाला आहे. सध्या राज्यात असणारा थंडीचा जोर कमी झाला आहे. उत्तर भारतात एकामागोमाग येणाऱ्या पश्चिमी झंजावाताची मालिका सुरूच असून, तेथील पाऊस, बर्फ, थंडी आणि सकाळच्या वेळी धुके पडणे सुरूच असणार आहे. आजपासून पुढील तीन दिवस महाराष्ट्रात सरासरीपेक्षा किमान तापमानात चार तर कमाल तापमानात दोन अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यतादेखील खुळे यांनी वर्तवली आहे.
https://twitter.com/RMC_Mumbai/status/1582010197056557057?s=20&t=8XhpmcU2mOqHHnUUWO34ig
Cyclone Threat Rainfall Forecast Weather