विशेष प्रतिनिधी, मुंबई/अहमदाबाद
अरबr सागरातून उठलेले चक्रीवादळ ताशी १८५ किलोमीटर वेगाने सोमवारी रात्री ८ च्या सुमारास गुजरातच्या किनारपट्टीवर आदळले. या चक्रीवादळामुळे आतापर्यंत कर्नाटक, गोवा, केरळ आणि महाराष्ट्रात १८ जणांचा मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश आहे. या सर्व राज्यांमध्ये हजारो घरांचे नुकसान झाले आहे. तर गुजरातमधील दिड लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
यापूर्वी महाराष्ट्रात मुंबईमध्ये यावादळाने अक्षरशः धुमाकूळ घातला आणि त्यात सहा लोकांचा मृत्यू झाला. दोन मोठ्या नाव समुद्रात असल्यामुळे त्यातील ४१० लोक वादळात फसले होते. त्यांचे जीव वाचविण्यासाठी नौदलाने मोर्चा सांभाळला. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, तौक्तेची किनारपट्टीला भिडण्याची प्रक्रिया जवलपास दोन तास चालली. या वादळाच्या आगमनापूर्वीच गुजरातमध्ये दिड लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र, गोवा, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसोबत तसेच दिव–दमणच्या उपराज्यपालांसोबत फोनवर चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच या वादळाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून संपूर्ण सहकार्य मिळेल, असे आश्वासन दिले. गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. गुजरातमध्ये सोमनाथ येथे आणि केंद्रशासित प्रदेश दीव–दमण येथे अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे कोसळ्यामुळे वाहतुक खोळंबली होती.










