विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली, मुंबई
देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर तौक्ते चक्रीवादळाच्या धुमाकुळीनंतर आता पूर्वेकडील किनारपट्टीवर वादळाची चाहूल लागली आहे. हवामान खात्याने उत्तर अंदमान सागर आणि पूर्व–मध्य बंगालच्या खाडीत २२ मेपर्यंत हवेचा दबाव असल्याने आणखी एक वादळ धडकू शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे. असे झाले तर २६ ते २७ मे या कालावधीत ओडिशा आणि बंगालच्या किनारपट्टीलगतच्या शहरांमध्ये हे वादळ धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे.
बंगालच्या खाडीत हवेचा दबाव निर्माण झाल्याने २२ मे किंवा त्यानंतर जी परिस्थिती निर्माण होईल, ती पुढील ७२ तासांमध्ये वादळाचे रुप धारण करू शकते. हवामान खात्यानुसार दक्षिण पूर्व मान्सून २१ मेपर्यंत दक्षिण अंदमान सागर आणि दक्षिण बंगालच्या खाडीत पोहोचणार आहे. या दोन्ही घटनांच्या व्यतिरिक्त वातावरणात आणखीही काही बदल होऊन २२ मेला पूर्व मध्य बंगालची खाडी आणि उत्तर अंदमान सागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे अंदमान आणि निकोबार बेट समूहात २२ ते २३ मेदरम्यान तुरळक पावसाची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये जोरदार पाऊस येऊ शकतो.
ओडिशा, बंगाल, आसाम, मेघालयमध्ये २५ मेच्या सायंकाळी अनेक भागांमध्ये तुरळक किंवा मध्यम गतीचा पाऊस येऊ शकतो. एप्रिल–मेमध्ये मान्सूनपूर्व पावसादरम्यान देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर कायम वादळ येत असतात. गेल्या वर्षी पूर्व किनारपट्टीवर सुपर सायक्लोन अंफन आणि पश्चिम किनारपट्टीवर गंभीर वादळ आधीच धडकून चुकलेले आहे.