इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजेच कॉमनवेल्थ गेम २०२२ सध्या जल्लोषात सुरु आहे. भारताने आतापर्यंत सहा पदकं पटकावली आहेत. ही सगळी पदकं वेटलिफ्टींगमध्ये मिळाली असून, पश्चिम बंगालच्या देऊलपूर गावातील अचिंता शेऊली याने भारताला सहावे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. शिवाय या स्पर्धेत विक्रमाचीही नोंद त्याने केली असून त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अचिंता शेऊली हा एका मध्यमवर्गीय कुटूंबातील असून २०२१च्या ज्युनिअर जागतिक वेटलिफ्टींग अजिंक्य स्पर्धेत ७३ किलो स्पर्धेत रौप्यपदक आणि राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेतील दोन सुवर्णपदकं त्याच्या नावावर आहेत. अचिंताचे वडील सायकल रिक्षा चालवून कुटूंबाचा उदरनिर्वाह करायचे. अचिंता आठवी इयत्तेत असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्या कुक्कुट पालन फार्मवरदेखील कोल्ह्यांनी हल्ला केली. त्यामुळे आधीच विस्कळीत झालेली आर्थिक परिस्थिती आणखीनच कोलमडली.
ही परिस्थिती सांभाळण्यासाठी अचिंताचा मोठा भाऊ, जो वेटलिफ्टर होता त्याने शिवणकाम शिकून कुटूंबाची जबाबदारी स्वीकारली. त्याचा आदर्श घेत अचिंतानेही शिवणकाम शिकून घेत घराला हातभार लावण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबरच वेटलिफ्टिंगचे स्वप्नही जिवंत ठेवले. सराव सुरु ठेवला आणि राष्ट्रकुल स्पर्धेपर्यंतचा प्रवास पूर्ण केला.
सध्या सुरु असलेल्या स्पर्धेमध्ये अचिंताने ७३ किलो वजनी गटाच्या वेटलिफ्टींगमध्ये स्नॅच प्रकारात सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीशी बरोबरी करताना १४३ किलो वजन उचलले. याच प्रकारात १३७, १४० व १४३ असे भार उचलत त्याने स्वतःचेच विक्रम मोडले. अचिंता, मोहम्मद आणि ऑस्ट्रेलियाचा बेंडन वोकलिंग यांच्यात अंतिम चुरस रंगली. अचिंताचा १७० किलोचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. पण तिसऱ्या प्रयत्नात त्याने १७० किलो वजन उचलून ३१३ किलोसह सुवर्णपदक पटकावले.
Cycle Rikshaw Driver Son Win Gold Medal Anchita Sheuli Commonwealth Games 2022