मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अलीकडच्या काळात राज्यात सायबर क्राईममध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. विशेषतः बेरोजगार युवक कामधंदा नसल्याने सोशल मीडिया मधील वेगवेगळ्या ॲपचा वापर करीत गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात. सायबर काईम संदर्भात कडक कायदे असतानाही अशा गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली दिसते. मुंबईमध्ये विलासी जीवन जगण्यासाठी युट्युबरच्या सहाय्याने नागरिकांच्या घरातून चोरी करणाऱ्या एका युवकाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, हा युवक मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील घरांना लक्ष्य करत असे. त्याच्याकडून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात साहित्य सापडले.
व्हीबी नगर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीचे नाव अभिमन्यू गुप्ता (३०) असे आहे. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय होता आणि त्याचे यूट्यूब, फेसबुकवर मोठ्या संख्येने फॉलोअर्स आहेत. तसेच अभिमन्यू गुप्ताच्या ताब्यातून १४ मोबाईल फोन तसेच धारदार शस्त्रे, इमिटेशन ज्वेलरी आणि विदेशी चलन जप्त करण्यात आल्याचे सांगितले. आरोपी अभिमन्यूने गेल्या आठवड्यात कुर्ला उपनगरातील एका बंद घरात प्रवेश केला आणि सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पळ काढला, असे त्याने सांगितले. घरात राहणाऱ्या लोकांनी परत येऊन दागिने गायब असल्याचे पाहिले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिस उपनिरीक्षक पद्माकर पाटील यांनी सांगितले की, पोलिस पथकाने घटनेनंतर १५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले, परंतु सुरुवातीला गुप्ता कॅप आणि फेस मास्क घातल्यामुळे त्याला ओळखता आले नाही. पण, एका क्षणी, त्याने त्याची टोपी आणि फेस मास्क काढला आणि त्याची ओळख अभिमन्यू गुप्ता म्हणून झाली.
पाटील यांनी पुढे सांगितले की, त्यानंतर आरोपी कुर्ल्यात येत असल्याची माहिती मिळाली, तेथे सापळा रचून आम्ही त्याला पकडले. त्यांनी दावा केला की, आरोपीने मुंबई परिसरातील १५ हून अधिक घरे फोडल्याची कबुली दिली असून, त्यापैकी चार कुर्ल्यातील आहेत. इंस्टाग्रामवर प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत त्याचे व्हिडिओ आहेत. त्याचवेळी आरोपीने कॅसिनोमध्ये पैसे खर्च करून महागडे कपडे खरेदी केल्याची कबुली दिली असल्याची माहिती त्यांनी दिली.