विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशभरात गेल्या काही वर्षांमध्ये सायबर क्राइम झपाट्याने वाढले आहे. विशेषत : नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान आदी राज्यांमध्ये सायबर गुन्हे उघड होत आहेत. अशाच एका सायबर क्राइममध्ये सुमारे २० कोटींची फसवणूक झाली असून या प्रकरणात ३५० पेक्षा जास्त जण गुंतले असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे.
याप्रकरणी आतापर्यंत ८ जणांना अटक झाली असून त्यांच्याकडून ३०० नवीन मोबाईल, १० लाखांच्या रोकड जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणांमध्ये एका रेल्वे अभियंत्याचा देखील समावेश आहे. आंध्र प्रदेश आणि झारखंड येथून सायबर सुरक्षा यंत्रणांनी फोनच्या फसवणुकी प्रकरणी रेल्वे अभियंत्यासह आठ जणांना अटक केली आहे. या आठ जणांपैकी चार झारखंडमधील, दोन बालाघाट (मध्य प्रदेश) आणि दोन आंध्र प्रदेशातील असून ही टोळी १८ राज्यात पसरली होती. यात मध्य प्रदेशचा २५ वर्षीय हुकुमसिंग बिसेन हा रेल्वेमधील सब इंजिनिअर सहभागी होता, या टोळीच्या संपर्कात येऊन तो या गुन्ह्यात सामील झाला.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीचे ९०० मोबाइल फोन, १००० बँक खाती आणि शेकडो युनिफाइड पेमेंट इंटरफेस आणि ई-कॉमर्स आयडी देखील ओळखले गेले आहेत आणि तपास सुरू आहे. सायबर व सुरक्षा पोलीस यांनी आतापर्यंत सुमारे १०० बँक खाती आणि डेबिट आणि क्रेडिट कार्ड व्यवहार रोखले आहेत. या टोळीच्या मोहीम तब्बल १८ राज्यात पसरली आहे. त्यात ३५० लोक सहभागी झाले होते. अखेर केंद्रीय गृह मंत्रालय, एफसीओआरडी, मध्य प्रदेश पोलिस आणि अन्य काही राज्यांच्या पोलिस दलांनी विशिष्ट माहितीवरुन ही कारवाई केली. या टोळीत शेकडो सदस्य सामील असून ते ओटीपी, क्रेडिट कार्ड, ई-कॉमर्स आणि बनावट आयडी, बनावट मोबाइल नंबर, बनावट पत्ते, काळाबाजार, कर चुकवणे, पैशांची चोरी आणि चोरीच्या वस्तूंसह व्यापारासह विविध टप्प्याटप्प्याने व्यवहार करत होते.