पानिपत (हरियाणा) – सध्याच्या काळात जवळपास प्रत्येकाकडेच मोबाईल आहे. परंतु या मोबाईलमध्ये असलेले वेगवेगळे ॲप्स वापरताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः फेसबुकवरून कुणी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तर ती मंजूर करणेदेखील धोक्याचे ठरू शकते. कारण या ॲपच्या माध्यमातून आणि यातून सायबर क्राईम घडताना दिसून येतात. त्यामुळे यासाठी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. येथे असाच एक गंभीर सायबर क्राईम उघडकीस आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करायचे. त्याची फ्रेंड रिक्वेस्ट अनेकांना पाठवायचे. त्याद्वारे मैत्री झाली की नंतर अश्लील व्हिडीओ बनवायचे. हे कॉल रेकॉर्ड करून संबंधित तरुणीला ब्लॅकमेल करायचे. अशा प्रकारच्या या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीतील दोन सदस्यांना पोलीसांनी अटक केली. याप्रकरणी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. तेथून एकाची रवानगी कारागृहात झाली आहे तर दुसऱ्याला सात दिवसांची कोठडी सुनावली आहे.
आरोपी दुसऱ्याच्या नावाने घेतलेले सिमकार्ड वापरून तरुणीच्या नावाने बनावट फेसबुक आयडी तयार करत असल्याचे उघड झाले. आधी तरूण किंवा तरुणींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची. त्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन व्हिडिओ कॉल करून मुलींमार्फत अश्लील चाळे करायचे. या दरम्यान तो व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केले जायचे. यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्या तरुणींकडून पैसे उकळायचे.
एका तरुणाने पोलिस ठाण्यात तक्रार दिली की, ५ डिसेंबरला एका तरुणीने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्याने ती स्वीकारली. त्यानंतर व्हिडिओ कॉल केला. मुलीने तिचे कपडे काढण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये हे संभाष सुरू होते. त्याचवेळी याचा व्हिडिओ तयार करण्यात आला आणि त्याच्या आधारे त्याला ब्लॅकमेल करण्यात आले. ५० हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचे तरुणाने तक्रारीत म्हटले आहे. दबावाखाली आल्याने अखेर त्याने १० हजार रुपये दिले. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवून तपास सुरू केला.
या प्रकरणातील आरोपी रिझवान सरफुद्दीन (रा. ओलांडा, भरतपूर, राजस्थान ) याला पुन्हाणा जुर्हरा मोड येथून अटक केली. यानंतर त्याचा साथीदार मोहम्मद वकील (रा. कैथवाडा, भरतपूर, राजस्थान) याला पकडण्यात आले. ते दोघे मिळून गुन्हे करायचे. आता रिझवानला पाच दिवसांच्या कोठडीत घेण्यात आले आहे. त्याच्या सांगण्यावरून मोहम्मद वकील याला पकडण्यात आले. दोघांकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.