नाशिक – भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाले असून त्यांनी याबाबत त्यांनी सायबर क्राइमला तक्रार दाखल केली आहे. या फेसबुक अकाऊंट वरुन मित्रांकडून पैशांची मागणी केल्याचा प्रकारही समोर आला आहे. शहाणे हे सध्या बंगलोर येथे काही कामानिमित्त गेले आहे. त्या संधीचा फायदा घेऊन कुणीतरी त्यांचे अकाउंट हॅक केले असून त्याचा गैरवापर केला जात आहे. या प्रकाराबाबत शहाणे यांनी सांगितले की, राजकीय द्वेषापोटी व मला बदनाम करण्याच्या हेतूने माझे फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आले आहे. माझ्या मित्र परिवाराकडून पैशांची मागणी त्याद्वारे करण्यात येत आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीचे अकाउंट हॅक करून त्याद्वारे पैसे मागण्याचा प्रकार प्रथमच सिडको परिसरात घडला असून त्यामागे राजकीय द्वेष असल्याचे त्यांनी सांगितले. या फेसबुक प्रकारामुळे सिडकोतील राजकारण चांगलेच तापले आहे.