नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून शहरात सायबर क्राइममध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. इतकेच नाही तर शहर सायबर पोलिसांकडे तक्रारींचा पाऊस पडत आहे. लॉकडाऊन नंतरच्या काळापासून सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे समोर येत आहे. गेल्या सहा महिन्यात तब्बल ३६१ तक्रारी दाखल झाल्या आहेत.
फसवणूक, अकाऊंट हॅकिंग, बँकिंग फ्रॉड, नेट बँकिंग अशा सायबर गुन्ह्यांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. शहर व परिसरात आर्थिक फसवणूक होण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे आकडेवारीवरून पुढे येते आहे. धक्कादायक बाब म्हणजे सोशल मीडियाद्वारे पाठलाग करून टार्गेट केले जाते आहे. खासकरुन महिलांच्या फसवणुकीचे प्रमाण अधिक आहे.
शहरात सातत्याने वाढणारे सायबर क्राइम पाहून पोलिसही चक्रावले आहेत. सहा महिन्यात तब्बल ३६१ तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्यात. मात्र, हा आकडा अधिक मोठा असण्याची दाट शक्यता आहे. कारण ऑनलाईन पद्धतीने फसवणूक झाल्यावरती तक्रार नोंदणी करूनही पुढे काहीच होत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे, यामुळे अर्ध्यापेक्षाही अधिक जण ऑनलाईन फसवणूक झाल्यास पोलिस ठाण्यात येऊन तक्रार देखील नोंदवत नाहीत.
सायबर क्राइममध्ये जरी मोठी वाढ होत असेल आणि गुन्हे देखील नोंद केले जात असतील तरीही तपास करण्यात पोलिसांना असंख्य अडचणी येत असल्याची वस्तुस्थिती आहे. किती मोठी फसवणूक सायबर क्राइम मध्ये झाली तरीही त्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना शक्यतो यश मिळत नाही. या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे नागरिकही शक्यतो ऑनलाईन पद्धतीने फसवणूक झाल्यास गुन्हा नोंद करणे टाळतात.
Cyber Crime Nashik Complaints Increased