नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बँक ग्राहकाच्या खात्यावर सायबर भामट्यांनी परस्पर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात बचत खात्यातून एक लाख रूपये लांबविण्यात आले असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वैभव सुभाष सोनजे (रा. जगतापनगर, उंटवाडी, सिडको) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सोनजे यांना सोमवारी (दि १२) दुपारच्या सुमारास अचानक त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या बचत खात्यातून पैसे काढण्यात येत असल्याबाबत मोबाईलवर संदेश प्राप्त झाल्याने ही घटना समोर आली.
सोनजे यांनी तातडीने बँक गाठून चौकशी केली असता त्यांच्या बचत खात्यातून पाच वेळी २० हजार रूपये याप्रमाणे एक लाख रूपये अन्य बँक खात्यात ऑनलाईन वर्ग करण्यात आल्याचे पुढे आले. अधिक तपास निरीक्षक शिरसाठ करीत आहेत.
 
			








