विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
रामजन्मभूमी ट्रस्ट अयोध्याच्या नावावर बनावट वेबसाइट तयार करून फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सुमारे एक कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले असून ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांच्या सायबर क्राइम टीमने या फसवणूकी टोळीचा पर्दाफाश केला असून बनावट वेबसाइट्स तयार करून आरोपींनी आतापर्यंत सुमारे एक कोटी रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी अशोक नगरजवळील नोएडा-दिल्ली सीमेवरून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून पाच मोबाईल, लॅपटॉप, २ सिमकार्ड, ५० आधार कार्ड, २ थंब इम्प्रेशन मशीन जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पाच आरोपी रामजन्मभूमी ट्रस्टच्या नावावर बनावट वेबसाइट तयार करून लोकांकडून देणगीच्या नावाखाली फसवणूक करीत होते. या प्रकरणात, मंदिर ट्रस्टच्या वतीने अयोध्या येथील रामजन्मभूमी पोलिस स्टेशनमध्ये आयटी कायद्यान्वये तक्रार दाखल करण्यात आला होता. या आरोपींनी चौकशीदरम्यान सांगितले आहे की, त्यांनी आतापर्यंत देणगीच्या नावाखाली ५०० हून अधिक जणांकडून सुमारे एक कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.
पोलिस आरोपींच्या बँक खात्यांचा मागोवा घेत असून या पैशांचा खर्च कुठे झाला याची माहिती मिळवत आहेत. सायबर क्राइम स्टेशनचे निरीक्षक विनोदकुमार पांडे यांनी सांगितले की, अटक केलेला आशिष गुप्ता हा या टोळीचा प्रमुख असून तो नोएडास्थित मॉर्डसन कंपनीत नोकरी करायचा. आशीष हा तंत्रज्ञानामध्ये पारंगत असून कंपन्यांच्या बनावट वेबसाइट डिझाइन करण्यासाठी प्रयत्न करीत होता.