नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कुतूहलापोटी एका तरुणीसोबत चॅटिंग करणे नागपुरातील एका जेष्ठ डॉक्टरला चांगलेच महागात पडले आहे. अश्लील चॅटिंग करुन जाळ्यात ओढत तरुणीने डॉक्टरला तब्बल 16 लाखांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पीडित डॉक्टरने प्रतापनगर पोलीस ठाण्यात तरुणीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस आरोपी तरुणीचा शोध घेत आहेत.
फेसबुक, व्हॉट्सॲपवर व्हीडिओ कॉलवरून अनोळखी व्यक्तीचा फोन आला, तर तो स्वीकारू नका. व्हिडिओ कॉलवर बोलल्यानंतर वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर करून दोन्हीकडील व्यक्तींना नग्न असल्याचे भासवून हा व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळले जात आहेत. चित्रपट कलावांतापासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अनेकांना ‘न्यूड कॉल्स’च्या माध्यमातून फसवणूक (सेक्सटार्शन) करण्याचा प्रकार सुरू आहे. खरे म्हणजे सेक्सटॉर्शन म्हणजे खंडणी आणि त्याचप्रमाणे लैंगिकतेचा आधार घेऊन किंवा लैंगिक छळ केल्याचा बनाव करून उकळली जाणारी खंडणी म्हणजे ‘सेक्सटॉर्शन’. एखाद्या व्यक्तीचा फोटो अथवा व्हिडीओमध्ये छेडछाड करून त्याला नग्न करून हा फोटो किंवा व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचे प्रकार नागपूर, पुणे मुंबईत वाढले आहेत.
नागपुरातील एका जेष्ठ डॉक्टरला एका अनोळखी तरुणीचा मॅसेज आला. मॅसेज आल्यानंतर डॉक्टरनेही तिच्याशी चॅटिंग सुरु केले. हळूहळू तरुणीने अश्लील चॅटिंग सुरु केले. चॅटिंगच्या माध्यमातून डॉक्टरला जाळ्यात ओढले. त्यांनतर चॅटिंग आणि अश्लील व्हिडीओ, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीने पैशांची मागणी केली. मात्र बदनामीच्या भीतीपोटी डॉक्टरने सुरुवातीला 6 लाख रुपये दिले. त्यानंतर वेळोवेळी मागणी करत तरुणीने तब्बल 16 लाख रुपये उकळले. तरुणीची पैशाची मागणी वाढत गेल्यावर, दहशतीमध्ये आलेल्या डॉक्टरने शेवटी नागपुरातील प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आता पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. अशा प्रकारच्या टोळ्या सक्रिय असून, वेळेत पोलिसांना तक्रार करा. अनोळखी व्यक्तीशी चाटिंग करु नका, असे आवाहन नागपूर पोलीस आयुक्त यांनी केले आहे.
आजकाल सायबर ठग लोकांकडून लैंगिक ब्लॅकमेलिंग म्हणजेच सेक्सटॉर्शन करून पैसे उकळत आहेत. सेक्सटॉर्शन म्हणजे वेबकॅम, मोबाईल किंवा व्हिडीओ कॉलद्वारे एखाद्याच्या लैंगिक क्रियाकल्प किंवा नग्न चित्रांचे रेकॉर्डिंग करणे आणि त्याद्वारे ब्लॅकमेल करणे याला सेक्सटॉर्शन म्हणतात. आता भारतातही सेक्सटॉर्शनची प्रकरणे वाढत आहेत.
Cyber Crime Doctor Sextortion Cheating