मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्याच्या काळात ऑनलाईन बँकिंग वाढले असून बहुतांश नागरिक ऑनलाइन पद्धतीने पैशाचे व्यवहार करतात. परंतु त्याचबरोबर सर्व सायबर क्राईम देखील वाढल्याने बँकेच्या ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. मात्र आपली फसवणूक झाल्यास त्यावर काही उपाय योजना देखील आहे.
डिजिटलच्या झपाट्याने विस्तारामुळे फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. फसवणूक करणारे नागरिकांकडून पैसे उकळण्यासाठी वेगवेगळे डावपेच अवलंबत आहेत. यासाठी आपण खूप सावध असणे आवश्यक आहे. विशेषत: कोणत्याही प्रकारचे अनोळखी कॉल, एसएमएस आणि लोभी गोष्टींपासून दूर राहावे. परंतु घोटाळा झाला असेल तर त्वरित कारवाई करून फसवणुकीत गमावलेले पैसे परत मिळवू शकता.
सायबर तज्ज्ञ सांगतात की, सायबर फसवणुकीत गमावलेल्या पैशांपैकी 90 टक्के पैसे फक्त 10 दिवसांत सापडू शकतात. पैसे मिळवण्यासाठी योग्य पावले उचलली पाहिजेत, नाहीतर तुमचे पैसे कायमचे गायब होतील.
त्याच वेळी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) देखील ग्राहकांना सांगते की, जर कोणत्याही प्रकारचा अनधिकृत व्यवहार झाला असेल तर योग्य वेळी माहिती देऊन ते पैसे परत मिळवू शकतात. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, अनधिकृत डिजिटल व्यवहारांमुळे तुमचे नुकसान होत असल्यास, तुम्ही ताबडतोब बँकेला कळवू शकता, त्यामुळे तुमचा व्यवहार कमी होईल किंवा रद्द होईल.
अनेक बँकांकडून अनधिकृत व्यवहारांविरुद्ध विमा पॉलिसी ऑफर केल्या जातात. म्हणजेच, जर तुम्ही तुमची तक्रार वेळेवर दिली तर तुम्हाला तुमच्या नुकसानीचे पैसे परत मिळू शकतात. बँकेचे ग्राहक सायबर फसवणुकीविरूद्ध थेट विमा पॉलिसी देखील खरेदी करू शकतात.
आरबीआयने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँकेने ग्राहकाने केलेल्या अनधिकृत व्यवहाराची माहिती तीन दिवसांच्या आत द्यायची आहे. या कालावधीत माहिती दिल्यास संपूर्ण पैसे परत केले जातात.
दुसरीकडे घटनेच्या 4 ते 7 दिवसांनी तक्रार केल्यास ग्राहकांना 25 हजार रुपयांपर्यंतचा फटका बसू शकतो. त्याच वेळी, जर तुम्ही निर्धारित मर्यादेनंतर तक्रार केली तर पैसे परत केले जाऊ शकत नाहीत. वेळेवर तक्रार केल्यानंतर, बँक 10 दिवसांच्या आत पैसे परत करते.