नाशिकरोड (इंडियादर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेसच्या सामाजिक दायित्व निधीतून पालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात अत्याधुनिक रक्तपेढी आणि त्यासाठीच्या भौतिक सुविधा उभारण्यासाठी ३ कोटी ६२ लाख २१ हजार ९१८ रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय बिटको आणि पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात अल्ट्रा सोनोग्राफी मशिन्ससाठीही ४८ लाख ७२ हजार रुपयांचा निधी दिला जाणार असल्याची माहिती मजदूर संघ अध्यक्ष जगदीश गोडसे यांनी शुक्रवारी दिली.
प्रेस कामगार व कामगार संघटनेने आजवर देशापुढील आपत्तीवेळी सामाजिक दायित्व निभावले आहे. प्रेस महामंडळाच्या सीएसआर निधीतून किंवा कामगारांच्या पगारातून आपत्ती परिस्थितीच्या पुनर्वसनासाठी वेळोवेळी मदत केली आहे. अनाथाश्रमामध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन व पाण्याची टाकी, आदिवासी पाड्यांच्या लोकवस्तीसाठी शौचालये नाशिक व नाशिकरोड मधील दिव्यांग व मुकबधीर मुलांच्या शाळेसाठी स्कुल बसेस, सिन्नर व घोटी येथे सुसज्ज वाचनालय व अभ्यासिका अशी अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, प्रेस महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती पात्रा घोष , सीएनपीचे मुख्य महाप्रबंधक बोलेवर बाबु, फायनान्स डायरेक्टर अजय अग्रवाल, एचआर डायरेक्टर एस. के. सिन्हा, नाशिक महानगरपालिका आणि मजदूर संघाच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे नाशिकरोड येथील बिटको हॉस्पीटल मध्ये अत्याधुनिक रक्तपेढीसाठी करन्सी नोट प्रेसच्या सी एसआरनिधीतून ३, ६२, २१,९१८ रुपये इतका निधी मंजूर झाला आहे.
कोविड काळात अल्ट्रा सोनोग्राफी मशिनरीच्या कमतरतेमुळे नागरिकांची गैरसोय होत असे. त्याकरीता सुध्दा बिटको हॉस्पीटल व इंदिरा गांधी हॉस्पीटल, पंचवटी, नाशिक येथे अल्ट्रा सोनोग्राफी, नवीन मशीन्ससाठी ४८,७२,००० रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. सामान्य व गरजू व्यक्तींना मुलभूत सुविधा मिळाव्यात या उद्देशाने आय.एस.पी. मजदूर संघाने या निधीसाठी प्रयत्न केले. हा निधी मिळावा याकामी खासदार हेमंत गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आय.एस.पी. मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदिश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, यांच्यासह सर्व सदस्य, वर्क्स कमेटीचे पदाधिकारी, वेल्फेअर फंड कमेटीचे जनरल सेक्रेटरी आदींनी पाठपुरावा केला होता.