नाशिक – नाशिकरोड येथील करन्सी नोट प्रेसमधून पाच लाख रुपयांच्या नोटा गायब झाल्यानंतर या प्रकरणी करन्सी नोट प्रेसचे सहायक प्रबंधक (विधी) अमित सतीष शर्मा यांनी उपनगर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर पोलीसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
शर्मा यांनी केलेल्या तक्रारीत २९ जून २०२१ च्या पूर्वी ५ लाख रुपयांच्या नोटा चोरीला गेल्याचे म्हटले आहे. ५०० रुपयाच्या १००० नोटा पॅकिंग सेक्शन अथवा अज्ञात करन्सी प्रेस कामगार, स्टाफ किंवा सिक्युरीटी यापैकी कोणीतरी चोरुने नेल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या या प्रेस मधून नोटा गायब कशा झाल्या असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसापासून प्रेसमधील ५ लाख रुपयांच्या नोटांचा हिशोब लागत नसल्याचे सांगितले जात होते. पण, याप्रकरणी कोणतीही तक्रार देण्यात आलेली नव्हती किंवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल झालेला नव्हता. पण, अंतर्गत चौकशी सुरु होती. या चौकशीत काहीही समोर न आल्याने शेवटी या प्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार देण्यात आली. केंद्रीय राखीव सुरक्षा दलाची कडेकोट सुरक्षा व्यवस्था प्रेसमध्ये असते. तरी सुध्दा या नोटा कशा बाहेर गेल्या हा प्रश्न सर्वांना पडला आहे.