नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गझल सादरीकरणाला, लेखनाला व्यासपीठ देण्यासाठी विश्वास ग्रुपतर्फे ‘गझल विश्वास’ ची सुरूवात करण्यात आली आहे. आज नव्या जुन्या पिढीतील गझलकार दर्जेदार गझललेखन करत आहेत. गझल संग्रह प्रकाशित करत आहेत. त्यांना एकत्र आणून दर महिन्याच्या दुसर्या शनिवारी वर्षभर गझल मुशायरा होणार आहे.
विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास जयदेव ठाकूर यांची संकल्पना असून, आयोजक विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युटचे सचिव विनायक रानडे व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओच्या समन्वयक ऋचिता ठाकूर आहेत तर समन्वयक संजय गोरडे आहेत.
डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास गार्डन शेजारी) ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे शनिवार दि. 28 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता वरिष्ठ पोलिस अधिक्षक मा.श्री. सुनिल कडासने यांच्या प्रमुख उपस्थितीत गझल विश्वासचा शुभारंभ होणार आहे.
सदर कार्यक्रम विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा जलालपूर, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास टर्फ, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे.
नाशिक येथे असलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तसेच उद्गीर येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गझलकट्टाला उस्फुर्त व जोरदार प्रतिसाद लाभला आहे. तसेच गझल लेखनातुन नवनवीन गझलकार वैष्ट्यिपुर्ण आशय मांडत आहेत.
अनेक गझल संग्रह प्रकाशित होत आहेत. मराठी गझलेला एका ठराविक साचे बद्धतेच्या पलिकडे घेऊन जाण्यात महत्वाचे योगदान देत आहेत. त्यानिमित्ताने गझल व्यापक होत आहे. त्याचबरोबर गझल प्रांतात नव्याने येणार्या गझलकारांसाठी वृत्त, मात्रा, ओळी, शेर गझलेच्या बाराखडी विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सर्वसमावेश गझलेची चळवळ असून त्यात जास्तीत जास्त गझलकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विश्वास जयदेव ठाकूर, विनायक रानडे, ऋचिता ठाकूर व समन्वयक संजय गोरडे यांनी केले आहे.
Cultural Nashik Gazal Katta Every Second Saturday