मुंबई – “छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF २०२०) करिता सन २०२०-२१ मध्ये एकूण पात्र २०५ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे. तसेच CSMNRF २०२० मधील अनुपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना ३ व ४ ऑगस्ट २०२१ रोजी मुलाखतीकरिता बोलविण्यात येणार आहे. सन २०२१-२२ साठी १७.०७.२०२१ रोजी सारथीच्या संकेतस्थळावर (https://sarthi-maharashtragov.in) जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून अर्ज करण्याचा अंतिम ३१ ऑगस्ट २०२१ आहे.
मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी प्रवर्गातील उच्चशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मेहनती आणि गुणवत्ताधारक पीएच.डी. व एम.फिल. करणाऱ्या उमेदवारांसाठी “छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती” (CSMNRF) व “मुख्यमंत्री विशेष संशोधन अधिछात्रवृत्ती” (CMSRF) अंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येते. ज्या विद्यार्थ्यांचे १ जानेवारी २०२० ते १५ जुलै २०२१ पर्यंत M.Phil/Ph.D ची नोंदणीची पुष्टी (Confirm Registration) झालेली आहे असेच विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.
“छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती” (CSMNRF) व “मुख्यमंत्री विशेष संशोधन अधिछात्रवृत्ती” (CMSRF) करिता आत्तापर्यंत ७०८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना CSMNJRF साठी रुपये ३१,०००/- व CSMNSRF साठी रुपये ३५,०००/- प्रतिमाह अदा करण्यात येतात. आजपर्यंत या विद्यार्थ्यांना २१ कोटी रुपये अधिछात्रवृत्ती त्यांच्या बँक खात्यात RTGS व्दारे अदा करण्यात आले आहेत.
“सारथी ने उपलब्ध करुन दिलेल्या संशोधन अधिछात्रवृत्ती योजनेच्या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन M.Phil/Ph.D माध्यमातून उच्चशिक्षण प्राप्त करावे असे, आवाहन व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केले आहे.