मनाली देवरे, नाशिक
…….
या सीझनमध्ये धावांचा पाठलाग करताना आज पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्स अपयशी ठरले. १६४ धावांचे आव्हान पेलण्यासाठी उतरलेला चेन्नई संघ १५७ धावांत बाद झाला आणि हा सामना सनरायझर्स हैद्राबाद संघाने ७ धावांनी जिंकला.
महेंद्र सिंग धोनी (३६ चेंडू ४७ धावा) आणि रवींद्र जडेजा (३७ चेंडू ५० धावा) यांनी एक महत्त्वपूर्ण भागीदारी रचली, परंतु षटकामागे आवश्यक असलेली धावगती या दोघांनाही राखता आली नाही. रशीद खान आणि अब्दुल सोबत या दोघांनी इतकी उत्कृष्ट गोलंदाजी केली की त्यांच्या ८ षटकात २३ चेंडूवर चेन्नईला एकही धाव घेता आली नाही.
सनरायझर्स हैद्राबाद संघ फलंदाजी करत असतांना चेन्नईच्या क्षेत्ररक्षकांनी सोडलेले झेल त्यांना चांगलेच महागात पडले. शोकांतिका ही आहे की, आता आजच्या पराभवानंतर ४ सामन्यात ३ पराभव झेलणा-या बलाढ्य चेन्नईकडे अवघे २ गुण जमा झाले आहेत. शेन वॉटसन, अंबाती रायडू आणि केदार जाधव हे त्यांचे मुख्य फलंदाज स्वस्तात तंबूत परतले आणि मग आवश्यक धावगती राखण्यात चेन्नईला लय सापडलीच नाही.
प्रियम गर्ग चमकला
२०२० च्या १९ वर्षाखालील विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाला अंतिम सामन्या पर्यन्त घेवून गेलेला कर्णधार प्रियम गर्ग या नव्या दमाच्या फलंदाजावर लिलावात मोठा दाव लावणाऱ्या सनरायझर्स हैद्राबादचा पैसा आज वसुल झाला. आज आयपीएलचे पहीले अर्धशतक (२६ चेंडूत ५१ धावा) झळकावतांना प्रियमने संघाचा डाव सावरला. अभिषेक शर्माने (३१ धावा) प्रियम सोबत एक चांगली भागिदारी रचून चेन्नई सुपर किंग्जला १६४ धावांचे माफक आव्हान देण्यात महत्त्वाची भुमिका अदा केली. दुखापतीनंतर संघात परतलेला ड्वेन ब्राव्हो आणि दीपक चहर यांनी चेन्नई तर्फे चांगली गोलंदाजी केली. परंतु, त्यांना क्षेत्ररकांची साथ मिळाली नाही.
आता विक एंड डबल धमाका
यंदाची आयपीएल सुरू झाल्यापासून रोज एक याप्रमाणे आत्तापर्यन्तसामना खेळला जातोय. परंतु आयपीएलच्या चाहत्यांसाठी ऑक्टोबर हीटचा तडाखा काही वेगळा असेल. ऑक्टोबर महिन्यातील प्रत्येक शनिवारी आणि रविवारी आता रोज २ सामने खेळवले जातील. यातला पहिला सामना दुपारी ३.३० वा सुरू होईल तर दुसरा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. उद्याच्या या डबल धमाका टाइमटेबल मध्ये पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स हे दोन ‘रॉयल’ संघ अबुधाबीत एकमेकांविरुद्ध लढतील तर दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात शारजाह मैदानावर होईल.