मनाली देवरे, नाशिक
……..
चेन्नई सुपरकिंग्ज संघाने आज एकही विकेट न गमावता किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा दणदणीत पराभव करुन साखळीत कमबॕक करण्याचा मोठा प्रयत्न केला आहे. ५ सामन्यात चेन्नईचा हा दुसरा विजय. परंतु हा विजय नोंदविण्यासाठी १७८ धावांचा पाठलाग करतांना १० गडी राखून सीएसकेने दुबईत इतिहास रचला. सलग तीन सामन्यात पराभव झाल्यानंतर सीएसके संघावर आणि खास करून महेंद्रसिंग धोनीवर टीकेची झोड उठली होती. त्या पार्श्वभूमीवर हा विजय अतिशय महत्त्वाचा मानावा लागेल.
वाॕटसन-डुप्लेसिस भागिदारी
शेन वॉटसन हा ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू. सलामीचा एक चांगला फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज सुद्धा. २००८ पासून आयपीएल मध्ये सातत्याने खेळतोय आणि १२५ ते १५० च्या स्ट्राइक रेटने धावा करतोय. फाफ डूप्लेसिस हा दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू. सलामीचा एक उत्तम फलंदाज आणि उजव्या हाताने लेग स्पिन करणारा गोलंदाज. २०१२ पासून सातत्याने आयपीएल खेळतोय. हे दोन खेळाडू या संघाचे सलामीचे फलंदाज आहेत आणि म्हणूनच चेन्नईचा संघ मजबूत आहे हे आज फक्त पुन्हा एकदा सिध्द झाले इतकेच. डग आउटमध्ये पहिल्या चेंडूपासून पॅड बांधून बसलेल्या सॕम करणला शेवटी पॕड सोडावे लागले, कारण एकही गडी न गमावता चेन्नईने १७८ धावांची मजल १७.४ षटकातच मारून नेली.
पंजाब संघाची चांगली फलंदाजी
प्रथम फलंदाजी करताना पंजाबच्या फलंदाजांनी खरेतर आज त्यांचे काम पूर्ण केले होते. के.एल.राहूल, मयंक अगरवाल आणि निकोलस पूरन या सगळ्यांनी धावा केल्या. परंतु चेन्नई सुपर किंग्जने त्या धावा कमीच असल्याचे सिध्द करुन दाखविले.
सोमवारचा सामना
आता सोमवार ते शुक्रवार रोज, फक्त एक सामना खेळला जाईल. सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात सामना होईल. विराटला सूर गवसलेला आहे ही रॉयल चॅलेंजर साठी आनंदाची बाब असेलही, परंतु दिल्ली कॅपिटल्सचे सगळेच यंगस्टर्स फार्मात आहेत ही विराट कोहली साठी डोकेदुखी ठरेल त्याचे काय ?. सामना रोमांचक होईल हे निश्चित.