नवी दिल्ली – क्रिप्टोकरन्सीचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच, क्रिप्टोकरन्सी हे टेरर फंडिंग आणि मनी लाँड्रिंगचे शस्त्र बनण्याची दाट शक्यताही व्यक्त केली जात आहे. याची तत्काळ दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. त्यामुळेच मोदींच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात एक महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक झाली आहे. या बैठकीत क्रिप्टोकरन्सी आणि संबंधित मुद्द्यांवर गंभीर चर्चा झाली. खोटी आश्वासने आणि पैशाचे आमिष दाखवून तरुणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा मुद्दा बैठकीत विशेषत्वाने चर्चिला गेला.
क्रिप्टोकरन्सीबाबत सरकार तज्ज्ञ आणि भागधारकांशी चर्चा करत राहील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील या बैठकीत फ्लोटिंग क्रिप्टो मार्केटला मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंगचे शस्त्र बनू दिले जाणार नाही यावरही चर्चा झाली. या दिशेने अधिक चांगले प्रयत्न करण्यासाठी ठोस रणनीती तयार करण्यात आली आहे. तसेच क्रिप्टो चलनाच्या गैरवापरावर चिंता व्यक्त करत सरकारने त्यावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा केली आहे.
किफायतशीर जाहिरातींच्या माध्यमातून तरुणांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न थांबवण्याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचप्रमाणे सरकारला हे एक प्रगत तंत्रज्ञान असल्याची जाणीव आहे, त्यामुळे त्यावर बारकाईने लक्ष ठेवले जाईल आणि सक्रिय पावले उचलली जातील. या क्षेत्रात सरकारने उचललेली पावले पुरोगामी आणि दूरदर्शी असतील यावरही एकमत झाले.
गेल्या काही वर्षांपासून अगदी झटपट श्रीमंत बनवणाऱ्या जगभरात क्रिप्टोकरन्सी म्हणजेच व्हर्च्युअल चलनाबाबत आणि क्रिप्टो मार्केट्सबद्दल भारतासह जगभरात चर्चा आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांच्यासह अनेक दिग्गजांना क्रिप्टो मार्केटमध्ये इन्ट्रेस आहे, तर काही दिग्गज या आभासी चलनापासून दूर राहण्याचा सल्ला देतात.
क्रिप्टोकरन्सी हा एक डिजिटल अॅसेट आहे, जो वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी वापरला जातो. या चलनात क्रिप्टोग्राफी वापरली जाते. आपण ते प्रॉपर्टी म्हणून वापरू शकतो, परंतु यासाठी बँक, एटीएम असे काही नसते. जगातील बऱ्याच देशांमध्ये क्रिप्टोकरन्सी ऑनलाईन शॉपिंगमध्ये वापरली जाते. प्रत्येक देशाचे स्वतःचे एक चलन असते. उदा. भारताचे चलन रुपया आहे. सौदी अरेबियाचं रियाल आणि अमेरिकेचे डॉलर हे चलन आहे. इतर देशांकडेही त्यांचे स्वतःचे एक चलन आहे. परंतु क्रिप्टोकरन्सी हे आभासी चलन आहे. ते नोटा किंवा नाणी स्वरुपात छापता येत नाही, तरीही त्याला मूल्य आहे.
क्रिप्टोकरन्सीची सुरुवात २००९ मध्ये झाली. बिटकॉइन ही जगातील सर्वांत मोठी क्रिप्टोकरन्सी असून तिच्यामुळेच क्रिप्टोकरन्सी जगाला माहित झाली. जपानमधील सतोशी नाकामोटो नावाच्या इंजिनीअरने बिटकॉइनची निर्मिती केली. जगभरात १हजार हून अधिक क्रिप्टोकरन्सीज आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी एक महत्त्वाची महत्त्वाची बैठक अशा वेळी झाली आहे जेव्हा काँग्रेसने नुकताच कोट्यवधी रुपयांचा बिटकॉइन घोटाळा आणि कर्नाटकातील भाजप सरकार लपवल्याचा आरोप करत या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे.