मुंबई – एखाद्या बँकेत दरोडा घालणाऱ्या चोराला त्याच बँकेने नोकरीवर ठेवून घेणे, ज्याने घरफोडी केली, दरोडा घातला त्यालाच कामावर ठेवून घेणे, अश्या घटना एखाद्या चित्रपटाच्या किंवा नाटकाच्या कथानकात शोभतात. पण एका बड्या कंपनीने चक्क असेच पाऊल उचलले आहे. हजारो कोटींनी लुटल्यानंतर लुटारूलाच नोकरीवर ठेवून घेण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.
क्रिप्टोकरन्सीचा जन्म झाल्यापासूनची सर्वांत मोठी चोरी काही दिवसांपूर्वी झाली होती. अर्थात क्रिप्टोकरन्सीच्या इतिहासात आजपर्यंत एवढी मोठी चोरी कधीच झाली नाही. यात हॅकर्सने 4 हजार 500 कोटींपेक्षा अधिक क्रिप्टोरकरन्सी चोरी केली होती. क्रिप्टोच्या ट्रान्सफरींगच्या क्षेत्रातील पॉली नेटवर्क या जगप्रसिद्ध कंपनीत ही चोरी झाली होती. आता पॉली नेटवर्कने आपल्याकडे चोरी करणाऱ्यालाच कामावर ठेवून घेतले आहे.
हॅकर्सच्या क्षमतेवर आम्ही खूश आहोत त्यामुळे त्याला नोकरी देण्यात आली आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे. व्हाईट हॅट असे हॅकरचे नाव सांगितले जात आहे. मात्र त्याचे खरे नाव अद्याप पुढे आलेले नाही, असा संशय व्यक्त होत आहे. आता कंपनी त्याला इथिकल हॅकर म्हणून ओळख देत आहे. कंपनीतील उणिवांची त्याने पूर्ण माहिती दिल्यामुळे पॉली नेटवर्कने त्याला मुख्य सुरक्षा सल्लागार म्हणून पदही बहाल केले आहे. अर्थात चोरालाच सुरक्षारक्षक म्हणून काम करण्याचे काम दिल्यासारखे आहे.
पैसा परतही मिळवला
हॅकींगच्या दुसऱ्याच दिवशी पॉली नेटवर्कला 1 हजार 930 कोटींची क्रिप्टोकरन्सी परतही मिळवून दिली आहे. त्यामुळे हॅकरला कामावर ठेवण्याचा चांगला परिणाम दुसऱ्याच दिवशी बघायला मिळाला आहे.
लोकांचे पैसे द्यावेच लागतील
पॉली नेटवर्कने हॅकरला नोकरी दिली असली तरीही त्याने चोरलेला पैसा लोकांना परत द्यावाच लागेल, अशी कंपनीची भूमिका आहे. अद्याप कंपनीची संपूर्ण क्रिप्टोकरन्सी परत आलेली नाही. हॅकरकडे अजूनही 235 डॉलर मिलीयनची क्रिप्टोकरन्सी आहे.