मुंबई – क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानला किल्ला न्यायालयाने १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. आरोपींचा जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे. आर्यनसह ८ जणांपैकी युवकांची आर्थर रोड तुरुंगात तर युवतीची भायखळा तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
कोणतीही विशेष सुविधा नाही
आर्यन सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा असल्याने त्याला तुरुंगात विशेष सुविधा मिळणार का असा सवाल उपस्थित होत असताना कोणत्याही आरोपीला विशेष सुविधा देण्यात येणार नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार, इतर कैद्यांना दिले जाणारे जेवण या आरोपींना मिळणार आहे. आर्यनचे तुरुंगातील दैनंदिन कार्य काय असेल हे जाणून घेऊयात.
विलगीकरणात राहणार
आर्यन आणि अरबाझ हे दोघेही नव्या कारागृहाच्या पहिल्या मजल्यावरील बॅरेक क्रमांक १ मध्ये राहतील. कारागृहाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आरोपींना ३ ते ५ दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सध्या त्यांना कोणताही पोषाख देण्यात आलेला नाही.
विशेष वागणूक नाही
आर्यन खानला कारागृहात कोणतीही विशेष वागणूक दिली जाणार नाही. घरच्या जेवणासाठी त्याला न्यायालयाकडून परवानगी घ्यावी लागेल. कोणालाही बाहेरील जेवण देता येणार नाही, असे कठोर निर्देश न्यायालयाने यापूर्वीच दिले आहेत.
सहा वजता उठणार
इतर कैद्यांप्रमाणे आर्यनला सकाळी ६ वाजता उठावे लागेल. ७ वाजता नाश्ता मिळेल. त्यामध्ये शिरा आणि पोहे दिले जाते. दुपारी आणि रात्री जेवणात भाजी-पोळी, वरण-भात दिला जाईल.
कँटीनमधून जेवण घेणार
कारागृहातील जेवण घ्यायची इच्छा नसेल तर आर्यन खान कँटिनमधून जेवण घेऊ शकणार आहे. त्यासाठी तो मनिऑर्डर करून घरच्यांकडून पैसे मागवू शकेल. कँटिनमधून जेवण केल्यानंतर कैदी तिथे फिरू शकतात. आर्यनचे विलगीकरणाचा काळ संपेपर्यंत त्याला ही सुविधा मिळणार नाही.
सायंकाळी सहाला जेवण
तुरुंगात रात्रीचे जेवण सायंकाळी सहा वाजता वाढले जाते. पण आरोपी रात्री आठ वाजेपर्यंत जेवणाची प्लेट आपल्याजवळ ठेवू शकतो. अशाप्रकारे आर्यनसुद्धा रात्री आठ वाजेपर्यंच जेवण करू शकेल.