मुंबई – क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला २० ऑक्टोबपर्यंत तुरुंगातच राहावे लागणार आहे. या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने सुरक्षित ठेवला आहे. अमली पदार्थ विरोधी यंत्रणेने (एनसीबी) आर्यनविरोधात बळकट पुरावे सादर करून जामिनाला जोरदार विरोध केला. एनसीबीने आर्यनवर ड्रग्ज चॅट, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज विक्रेत्यांसोबत संबंध आणि ड्रग्ज ट्रॅफिकिंगसारखे गंभीर आरोप लावले आहेत. एनसीबीने आर्यनच्या व्हॉट्सअॅप चॅटचा हवाला दिल्याने अडचणी वाढल्या आहेत.
आर्यन खानचे व्हॉट्सअॅप चॅट
१) अरबाझ मर्चंटकडे आढळलेले ६ ग्रॅम चरस आर्यनसाठी सुद्धा होते. एनसीबीचे वकील अतिरिक्त महाधिवक्ते अनिल सिंह यांनी अरबाझ आणि आर्यनच्या व्हॉट्सअॅप चॅट न्यायालयात नोंद करण्याची मागणी केली. त्या चॅटमध्ये लिहिले होते, की ते धमाल करण्यासाठी जात आहेत.
२) एनसीबीने यापूर्वी न्यायालयाला सांगितले, की आर्यन काही परदेशी नागरिकांच्या संपर्कात होता. या प्रकरणात दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.
३) आर्यनच्या चॅटमध्ये bulk qantity (अधिक प्रमाणात)चा उल्लेख करण्यात आला होता. हा मेसेज खासगी उपयोगासाठी नव्हता, असा दावा एनसीबीने केला आहे. तसेच एनसीबीने आर्यनवर ड्रग्ज तस्करीचे आरोपही लावले आहेत.
आर्यनच्या वकिलांचा दावा
आर्यन खानकडून अमित देसाई आणि सतीश मानेशिंदे या प्रसिद्ध वकिलांनी बाजू मांडली. या प्रकरणात व्हॉट्सअॅप चॅटला अधिक महत्त्व देऊ नये. आजची पिढी सामान्य इंग्रजी पेक्षाही वेगवेगळ्या पद्धतीने इंग्रजी शब्दांची मांडणी करते, असा दावा अमित देसाई यांनी केला. आजची पिढी चॅटमध्ये इंग्रजी शब्दांचाच वापर करते. ती क्वीन इंग्रजी असते. त्यांच्या बोलण्याची पद्धत खूपच वेगळी असते, असे देसाईंनी म्हटले आहे. आर्यन काही दिवसांपूर्वी परदेशात होता. चॅटवरील चर्चा त्या काळातील असेल तर परदेशांमध्ये अनेक गोष्टी अधिकृत असतात ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, असा तर्क देसाईंनी मांडला. चॅटवर करण्यात आलेल्या चर्चेमुळे अनेक वेळा गैरसमज निर्माण होऊ शकतात. व्हॉट्सअॅपवरील चर्चा खासगी मानली जाते. मोबाईलवर रेव्ह पार्टीसंदर्भात कोणताच संदेश नाही.