मुंबई – अभिनेता शाहरुख खान पुत्र आर्यनसह त्याच्या तिघा मित्रांना आज दिलासा मिळालेला नाही. मुंबई जवळच्या समुद्रात एका हॉटेलसदृश नौकेत (क्रूझ) ड्रग्ज पार्टी केल्याप्रकरणी या तिघांना अंमली पदार्थ नियंत्रण संस्थेने (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबी) अटक केली होती. काल या तिघांना एनसीबीच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. या तिघांची कसून चौकशी करायची असल्याने आणि अंमली पदार्थांच्या व्यापाराची अधिक माहिती घ्यायची असल्याने कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार आर्यनसह मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीने एक दिवसाची कोठडी दिली होती. ही कोठडी आज संपल्याने त्यांना पुन्हा एनसीबीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. अद्यापही संपूर्ण चौकशी झालेली नसल्याने या तिघांच्या कोठडीत वाढ करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे. परिणामी, येत्या ७ ऑक्टोबर पर्यंत या तिघांना कोठडीतच रहावे लागणार आहे. या काळात त्यांची कसून चौकशी होणार असून अंमली पदार्थांचा व्यापार, त्याचे विक्रेते यासह त्याचे वापर कर्ते यांचा शोध एनसीबी घेणार आहे.
एनसीबीने क्रूझ पार्टीवर केलेल्या छापेमारीत कोकेन, हशिस आणि एमडीसारखे अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले.. या कारवाईत दहा पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले होते. जवळपास सात तास चाललेल्या कारवाईत हायप्रोफाईल आणि सेलिब्रिटिज गळाला लागले. मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या या क्रूझमध्ये हायप्रोफाइल ड्रग्ज पार्टी सुरू होती. एनसीबीचे अधिकारी प्रवाशांच्या रूपात क्रूझमधून प्रवास करत होते. ड्रग्ज पार्टी सुरू झाल्यानंतर एनसीबीने छापा मारला. या कारवाईत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. क्रूझवर उपस्थित प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले. छापेमारी रात्री उशिरापर्यंत करण्यात आली.
https://twitter.com/ANI/status/1444999784889077763