मुंबई – क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात आज अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे अभिनेता शाहरुख खानकडे या प्रकरणात तडजोड करण्यासाठी तब्बल २५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे. तसेच, यात १८ कोटींवर तडजोड होत ८ कोटी रुपये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) अधिकारी समीर वानखेडे यांना मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे गेले काही दिवसांपासून सुरू असलेल्या या सर्व प्रकरणाला आता नवा आयाम मिळाल्याचे दिसून येत आहे.
अभिनेता शाहरुख खानचा पुत्र आर्यन खान हा क्रूझ ड्रग पार्टीत एनसीबीच्या हाती लागला. आर्यनसह त्याच्या मित्रांना जेरबंद करण्यात आली. याप्रकरणी त्यांना कोठडीही झाली. १८ दिवस झाले तर आर्यनला जामीन मिळत नसल्याने हे सर्व प्रकरण गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. तर, या सर्व प्रकरणात पैशाचा गंभीर व्यवहार होत असल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार किरण गोसावीचा बॉडीगार्ड असलेल्या प्रभाकर साईल याने केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हे प्रकरण आता अतिशय गंभीर झाले आहे.
https://twitter.com/sohitmishra99/status/1452154113672695818
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या सर्व प्रकरणात एनसीबीच्या कारभारावर आणि खासकरुन समीर वानखेडे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले. वेळोवेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध दावे केले. काही पुरावेही सादर केले. या सर्व आरोपांना वानखेडे यांनी तत्काळ उत्तरही दिले. मात्र, आता मलिक यांनी केलेले आरोपांमध्ये काही तरी तथ्य असल्याचे दिसू लागले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यात दिसून येत आहे की, मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावीच्या कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्या. त्या नक्की का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच, गोसावीच्या बॉडीगार्डने म्हटले आहे की, २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडे करण्यात आली. अखेर १८ कोटींवर डील झाली. यातील ८ कोटी रुपये वानखेडे यांना मिळणार होते.
या सर्व प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले असून आता पुढे काय घडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. कारण, या सर्व प्रकरणात महाविकास आघाडी सरकारने केंद्रातील भाजपला लक्ष्य केले आहे. तर, केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणि मुंबईत खळबळ वाजविण्याचा प्रयत्न होत असल्याचे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटले आहे. तर, अभिनेत्याच्या मुलाला वाचविण्यासाठी सत्ताधारी मंत्री प्रयत्न करीत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
https://twitter.com/rautsanjay61/status/1452169113023832072