मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जगासह देशभरात कोरोना रुग्णसंख्येने पुन्हा एकदा उचल खालली आहे. त्यामुळे जगभरात पुन्हा दहशतीचे वातावरण आहे. देशात आणि राज्यात निर्बंध लावण्यात आले असून, नियम पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. प्रवासात किंवा गर्दीच्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने रुग्णसंख्येचा स्फोट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर एका क्रूझ जहाजावर कोरोनाबाधित आढळल्याने जहाजावरील सर्व प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.
मुंबईहून गोव्याला जाणार्या कॉर्डेलिया क्रूझ जहाजावरील चालक दलातील एक सदस्य कोरोनाबाधित आढळला आहे. त्यामुळे क्रूझवर प्रवास करणार्या दोन हजार प्रवाशांसह चालक दलाच्या सदस्यांची चाचणी करण्यात येत आहे. संक्रमित क्रू सदस्याला जहाजात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
पीपीई किट परिधान करून एक वैद्यकीय पथक दोन हजारांहून प्रवासी आणि चालक दलातील सदस्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी पोहोचली होते. त्यांच्या परीक्षणाचे निकाल हाती येणे बाकी आहे. आरटीपीसीआर चाचणीचे निकाल हाती येईपर्यंत प्रत्येकाला क्रूझमधून बाहेर जाण्याची मनाई करण्यात आली आहे. क्रूझ सध्या मोरमुगाओ पोर्ट क्रूझ टर्मिनलजवळ आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टने क्रूझला गोव्यात थांबण्याची परवानगी दिलेली नाही. अँटिजन चाचणीमध्ये क्रू सदस्य पॉझिटिव्ह आढळला होता. दरम्यान, आतापर्यंत एकच क्रू सदस्य संक्रमित आढळला असला तरी इतरांचे कोरोना अहवाल येणे बाकी असल्याने त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे.