नवी दिल्ली – पहिलवान सागर धनखड हत्येप्रकरणी ऑलिम्पिक पदकविजेता पहिलवान सुशील कुमार याचा अद्याप सुगावा लागलेला नाही. या घटनेचे छत्रसाल स्टेडिअममधील सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून सुशील कुमार आणि त्याच्या टोळक्या क्रूरता समोर आली आहे. यामध्ये सुशील कुमार याच्यासह २० ते २५ पहिलवान आणि असौदा येथील टवाळखोरांची टोळी सागर धनखडसह इतर दोघांना जनावरांसारखी मारहाण करतानाचे दृश्य कैद झाले आहे.
सर्व संशियत सागरला लाथा-बुक्क्या, काठ्या, बॅट, हॉकीच्या बॅटने मारहाण करताना सीसीटीव्हीत व्हिडिओमध्ये दिसत आहेत. सागर आणि इतर दोन पीडितांना सुशील कुमार हॉकीच्या बॅटने मारहाण करताना दिसत आहे. सर्व पहिलवान आणि टवाळखोरांची टोळी सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. यातील इतर संशयितांवर बक्षीस जाहीर करण्याची तयारी दिल्ली पोलिसांकडून करण्यात आली आहे. सर्व २० ते २५ संशयितांनी सागर आणि इतर दोघांना अर्धमेला होऊस्तर मारहाण केली होती. पीडितांना अगदी जनावारांसारखी मारहाण करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. कारागृहात असलेला सुशीलचा मित्र नीरज बाली त्याला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. जामीन अर्ज रद्द झाल्यामुळे सुशील कुमार आता पोलिसांच्या स्वाधीन होण्याची तयारी करत आहे.
सुशील कुमार पंजाबमध्ये
तो रोज ठिकाणे बदलत आहे. काही तास एका ठिकाणी राहिल्यानंतर तो दुस-या जागी जातो. यादरम्यान तो काही नातेवाईकांच्या मोबाईला वापर करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो आता हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधून निघून पंजाबला पोहोचला आहे. गुरुवारी (२० मे) दिवसा आणि रात्री त्याचे लोकेशन पंजाबच्या काही जिल्ह्यात दिसले होते. उत्तर पश्चिम जिल्ह्यातील काही पथके सुशीलला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहे. एका दिवसापूर्वी सुशील कुमारचे लोकेशन बहादूरगढमध्ये दिसले.