इंडिया दर्पण वृत्तसेवा – स्वच्छतेचे संस्थात्मकरण आणि शासकीय कार्यालयांतील प्रलंबित कामे निकाली काढण्यासाठी, 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत संपूर्ण देशभर विशेष स्वच्छता मोहिम 5.0 राबविण्यात येत आहे.याचाच एक भाग म्हणून ग्रुप सेंटर, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), पुणे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागाने स्वच्छता मोहिमांचे आयोजन करण्यासाठी पुणे शहरातील आठ प्रमुख ठिकाणे निश्चित केली आहेत.
या मोहिमेत तळेगाव बस स्थानक आणि तळेगाव रेल्वे स्थानक येथे आज स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात कमांडंट के के चंद यांच्या नेतृत्वाखाली ग्रुप सेंटर, केंद्रीय राखीव पोलीस दल, पुणे येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या अभियानात स्थानिक नगर परिषद प्रतिनिधी, रोटरी क्लब, तळेगाव दाभाडे येथील पदाधिकारी आणि स्वयंसेवक, तसेच इनर व्हील क्लब, निगडी प्राईड चे सदस्य यांनीही सहभाग घेतला आणि सीआरपीएफच्या सोबतीने परिसराची स्वच्छता केली.
स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा सीआरपीएफ च्या वतीने सन्मान करण्यात आला. या सन्मानाला प्रतिसाद म्हणून या संस्थांनी सीआरपीएफ ग्रुप सेंटरच्या सफाई मित्रांचा सत्कार केला, त्यांच्या निष्ठावान सेवेप्रति कृतज्ञता व्यक्त केली. या मोहिमेमुळे बस स्थानक, रेल्वे स्थानक, रेल्वे पुल आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.
या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांसह महाराष्ट्र राज्य परिवहन आणि रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनीही कौतुक केले आणि सीआरपीएफ चे मन:पूर्वक आभार मानले. सीआरपीएफ ने सामाजिक जबाबदारी म्हणून ही स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे, असे कमांडंट के के चंद यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी सदस्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली, ज्यामध्ये त्यांनी परिसर तसेच आजूबाजूचे वातावरण स्वच्छ आणि हरित ठेवण्यासाठी आपल्या सामूहिक वचनबद्धतेचा पुनरुचार केला.