रविंद्र धारणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर – महाशिवरात्र म्हणजे भगवान शिवशंकराचा उपासणेचा दिवस, यादिवशी भगवान शिवशंकराची आराधना केल्यास विशेष पुण्यप्राप्ती व फलप्राप्ती प्राप्त होते, अशी शिवभक्तांची श्रद्धा आहे त्यामुळे आद्य ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आज भाविकांनी मोठया प्रमाणावर गर्दी केली होती. जवळपास एक लाख भाविकांनी आज येथे हजेरी लावली.
महाशिवरात्र पर्वकाळानिमित्त स्थानिक दहा आखाडे, आश्रम व मठातील साधुसंतांनी आज कुशावर्तामध्ये पर्वस्नान केले. कुंभमेळा स्नानाची आठवण यावी, असा हा सोहळा होता. रात्री दोन वाजे पासून श्रीपंचायती निरंजनी आखाड्यामध्ये साधुसंत जमण्यास सुरुवात झाली. बॅण्ड पथक, दोन ढोलपथक, पेशवाई थाटाच्या लाईटच्या छत्र्या असा सर्व लवाजमा मिरवणुकीने निघाला. डॅा. आंबेडकर चौक, नगर पालीका कार्यालय, रिंग रोड, तेली गल्ली मार्गे मिरवणूक कुशावर्तावर आली. मिरवणूक ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मिरवणुकीत महंत शंकरानंद सरस्वती तथा भगवान बाबा, महामण्डलेश्वर १००८ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती (निरंजनी आखाडा), १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज (जुना आखाडा), ठाणापती महंत विष्णुगिरी महाराज (जुना आखाडा), ठाणापती महंत धनंजयगिरीजी (निरंजनी आखाडा), पिर गणेशनाथजी महाराज ( गोरक्षनाथ मठ ) आदींसह विविध आखाड्यांचे ठाणापती, पदाधिकारी, साधुमहंत, भक्त परिवार सामील झाले होते. कुशावर्त तिर्थावर गंगापुजन करुन सर्वांनी पर्वस्नान केले. यानंतर ठिक चार वाजता सर्व साधुसंतांनी भगवान त्र्यंबकेश्वराच्या गर्भगृहात जाऊन पूजा केली. मंदिराच्या सभामंडपात आरती केली. पुजेचे पौरोहित्य जुना आखाड्याचे तिर्थपुरोहित वेदमुर्ती त्रिविक्रम जोशी, निरंजनी आखाड्याचे तीर्थपुरोहित वेदमुर्ती प्रमोद जोशी, रतिश जोशी, प्रविण देशमुख यांनी केले. देवस्थान ट्रस्टच्या वतीने विश्वस्त भुषण अडसरे यांनी सर्व साधुसंतांचे स्वागत केले. यावेळी माजी नगरसेवक शामराव गंगापुत्र उपस्थित होते. यानंतर गोरक्षनाथ मठामध्ये सर्वांना अल्पोपहार देण्यात आला. तेथुन सर्व साधुसंत निरंजनी आखाड्यात आले व नंतर आपापल्या स्थानावर निघून गेले. पर्वस्नान बघण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यापुढे दरवर्षी ही परंपरा चालु ठेवणार असल्याचे महंत शंकरानंद सरस्वती यांनी सांगितले.
पहाटे पासूनच भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दर्शनबारीतील दर्शनार्थी भाविकांच्या रांगा पूर्णपणे भरून दर्शन मंडपाच्या बाहेर थेट उदासीन आखाडया पर्यंत गेली होती. मंदिराच्या उत्तर दरवाजाने सशुल्क दर्शनबारी होती, सशुल्क दर्शनासाठीही मोठी रांग लागली होती. स्थानिक नागरीकांना नेमुन दिलेल्या वेळेत पश्चिम बाजुच्या दरवाजातून दर्शनासाठी सोडण्यात येत होते. सर्व भाविकांना दर्शन करून दक्षिण बाजुच्या दरवाजातुन बाहेर सोडण्यात येत होते. दर्शनबारी मधून बम बम भोले चा जयघोष सुरू होता. पर्वकाळानिमित्त महादेवाला वाहण्यासाठी बेल, बेलफळ, फुलं, कवठं, याचबरोबर उपवासाचे पदार्थ खजुर, केळी, द्राक्ष आदींची बाजारपेठेत मोठया प्रमाणावर आवक झाली होती तर उसाच्या रसाचीही तडाखेबंद विक्री झाली.
अवर्णनीय पालखी सोहळा
दुपारी ठिक ३ वाजता भगवान त्र्यंबकराजाच्या पालखी सोहळ्याला सुरूवात झाली. पानाफुलांनी सजविलेल्या पालखीत भगवान त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा विराजमान करून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. वर्षभरातून फक्त एकच दिवस म्हणजे महाशिवरात्रीस निघणारी पालखी माजी सोल ट्रस्टी जोगळेकर यांचे घरावरुन अर्थात पाचआळी परिसरातून नेण्यात येते. यामुळे संपुर्ण पाचआळी परिसरात अतिशय सुंदर असे फुलांचे गालीचे तयार करण्यात आले होते. श्री भगवान परशुराम मंदिरा समोर भगवान त्र्यंबकेश्वराची आरती करण्यात आली. नंतर देवस्थानचे पुर्वसंस्थानीक जोगळेकर यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांनी पालखीचे स्वागत व पुजा केली. ठिकठिकाणी पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली तर सुवाशिनिंनी भगवान त्र्यंबकेश्वराचे औक्षण करुन श्रीफळ, कवठाचे फळ अर्पण केले. त्यानंतर श्री बल्लाळेश्वर मंदिर मार्गे पालखी कुशावर्त तिर्थावर आणण्यात आली. तेथे एक तास भगवान त्र्यंबकेश्वराची पुजा, अभिषेक व आरती करण्यात आली. स्नान आटोपून पालखी पुन्हा मंदिरात आणण्यात आली. दोन बॅण्ड पथक तसेच दक्षिणात्य चेंडावाद्यम ढोल पथक असा अत्यंत भावपुर्ण सोहळा संपन्न झाला. या पालखी सोहळयामध्ये देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त प्रशांत गायधनी, अॅड. पंकज भुतडा, दिलीप तुंगार, संतोष कदम, भुषण अडसरे, तृप्ती धारणे, पदाधिकारी समीर वैद्य, उदय पाटील यांचेसह भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.
मंदिराचे विलोभनीय दृश्य
महाशिवरात्र पर्वकाळा निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरास सुंदर विद्युत रोषणाई केली होती. त्याचे विलोभनिय दृष्य पाहण्यासाठी भाविक आवर्जुन वेळ काढत होते. अनेक भाविकांनी येथे सेल्फीचा आनंद लुटला. महाशिवरात्री निमित्त मध्यरात्री विश्वकल्याणार्थ भगवान त्र्यंबकेश्वराची विशेष महापुजा व मंदिराच्या प्रांगणात पालखी सोहळा संपन्न होईल. पोलीस निरीक्षक संदिप रणदिवे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. अश्विनी टिळे, राणी डफळ व सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. खासगी वाहनांना गावामध्ये प्रवेशबंदी करण्यात आली होती.