फारुखाबाद (उत्तर प्रदेश) – येथे सुरु असलेल्या विश्व हरी सद्भावना धार्मिक सभेला जमलेल्या गर्दीमुळे शहरात सर्वत्र वाहतूक कोंडी झाली होती. इतकेच नव्हे तर इटावा-बरेली महामार्गावर सात किमी लांबच लांब रांगा लागल्याने वाहनांची रहदारी ठप्प झाली. विशेष म्हणजे सभेसाठी ५० जणांची परवानगी घेण्यात आली होती, मात्र या ठिकाणी हजारो नागरिक विना मास्क आले, असे प्रशासनाचे म्हणणे आहे, तसेच उत्तर प्रदेशसह विविध राज्यांतून आलेल्या हजारोंच्या जमावाने मास्क न घालता कोरोना प्रोटोकॉलचीही पायमल्ली केली.
या प्रकरणी प्रशासनाने आयोजकांना नोटीस बजावून गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. येथील लकुला हाऊसिंग डेव्हलपमेंटच्या एका मैदानात ७ दिवसांचा सद्भावना धार्मिक सोहळा सुरू असून पहिला मंगळ असल्याने सोमवारी रात्रीपासूनच समागमाला गर्दी होऊ लागली होती. तसेच भाविक विश्व हरीचा आशीर्वाद घेण्यासाठी इतके आतुर झाले होते की अनवाणी पायांनी सभेकडे धावत होते. त्यामुळे सकाळी दहा ते रात्री १० वाजेपर्यंत शहर वाहतूक ठप्प झाली होती.
रात्री उशीरापर्यंत शहरातील एकही रस्ता रिकामा नव्हता. दरम्यान नगर दंडाधिकारी दीपाली भार्गव यांनी सांगितले की, या सोहळ्याचे संयोजक यांनी कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्यासाठी या समारंभात केवळ ५० जणांची उपस्थित राहण्यासाठी परवानगी घेतली होती. मात्र यानंतरही मोठी गर्दी झाली होती, त्याबद्दल आता आयोजकांना नोटीस बजावण्यात आली. दि११ डिसेंबरपर्यंत हा कार्यक्रम चालणार असताना प्रशासनाची कडक भूमिका पाहता हा कार्यक्रम ४ दिवसात संपवण्यात आला.