नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक पिकाची उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण करुन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात खरीप हंगामासाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या पीक स्पर्धेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक मोहन वाघ यांनी केले आहे.
खरीप हंगामासाठी भात,ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तुर, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल, मुग व उडीद या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किमान लागवड क्षेत्र 10 गुठे असावे. शेतकरी प्रति पिक रुपये 300 प्रति या प्रमाणे प्रवेश शुल्क भरुन स्पर्धेत भाग घेऊ शकतो. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांचा स्वत:च्या नावावर जमिनीचा सातबारा व 8-अ उतारा आवश्यक राहील. तसेच आदिवासी गटाच्या शेतकऱ्यासाठी जातीचा दाखला आवश्यक राहील.
तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तर स्पर्धा घेण्यात येणार आहे. सर्वसाधारण व आदिवासी गटातील विजेत्या गटाला तालुकापातळीवर प्रथम 5 हजार, द्वितीय 3 हजार व तृतीय २ हजार आहे. जिल्हापातळीवर प्रथम 10 हजार, द्वितीय 7 हजार व तृतीय 5 हजार आहे. विभागीयपातळीवर प्रथम 25 हजार, द्वितीय 20 हजार व तृतीय 15 हजार आहे. राज्यपातळीवर प्रथम 50 हजार, द्वितीय 40 हजार व तृतीय 30 हजार रुपयांची परितोषिके देण्यात येईल.
तालुका व जिल्हा पातळीवरील पिकस्पर्धा स्वतंत्र होणार आहे. खरीप हंगामासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मुग व उडीद पिकासाठी 31 जुलै 2022 व इतर पिकामध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तुर, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या पिकांसाठी 31 ऑगस्ट 2022 आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.
Crop Competition for Farmers 50 Thousand Prizes